मुंबई : गेल्या महिन्यात भांडुप स्थानक परिसरात झालेल्या बेस्ट बसचा अपघात गर्दीमुळे झाला. त्यामागे कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता, असा दावा बसचा चालक आणि आरोपी संतोष सावंत याने जामिनाची मागणी करताना केला आहे. सावंत याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता व दहाजण जखमी झाले होते.

भांडुप स्थानकाबाहेरील रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. हा रस्ता फेरीवाल्यांनीही व्यापलेला आहे. परिणामी घटनेच्या वेळी आपले वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, असा दावा सावंत याने जामीन अर्जात केला आहे. आपण हा अपघात हेतुपुरस्सर घडवून आणलेला नाही. तसेच, आपण यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नाही, असेही सावंत याने अर्जात म्हटले आहे.

आपण निर्दोष आहोत आणि या दुर्दैवी घटनेमुळे आपल्याला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले आहे, असा दावा करताना अपघाताच्या वेळेची परिस्थितीही त्याने जामीन अर्जात विशद केली आहे. भाडुंप स्थानकाबाहेर रस्ता अरुंद, गर्दीचा आणि फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. अचानक समोर आलेल्या एका रिक्षाला आणि पादचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्नात आपले बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, या घटनेमागे कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता, असा पुनरूच्चार सावंत याने जामीन अर्जात केला आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाची ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची इलेक्ट्रिक बसने २९ डिसेंबरच्या रात्री भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर पादचाऱ्यांना धडक दिली होती. त्यानंतर बसचा चालक सावंत याला भांडुप पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.