मुंबई : भांडुपच्या कोकणनगर परिसरात बेस्टच्या भाडेतत्वावरील बसचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावर उभ्या दोन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली. भाडेतत्वावरील बसच्या वाढत्या अपघातामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ओशिवरा आगारातील भाडेतत्वावरील बस मार्ग क्रमांक ए- ४२५ कोकण नगर भांडुपला गेली होती. कोकण नगरच्या दिशेने उजवीकडे वळण घेणे बसला शक्य होत नव्हते. परिणामी, बस मागे (रिव्हर्स) घेण्यात आली. त्याच वेळी बसचा मागील भाग एका पादचाऱ्यावर धडकला. तो पादचारी एका मोठ्या ‘ट्री प्लांटर’ (झाडाची कुंडी/कट्टा) आणि बसचा मागील भाग यांच्यामध्ये अडकला. अतुल अनंत पडवे असे या पादचाऱ्याचे नाव आहे.
अपघातानंतर तेथे जमलेल्या अन्य पादचाऱ्यानी बसला धक्का मारून पुढे ढकलले आणि त्यानंतर पडवे यांची सुटका झाली. या प्रक्रियेदरम्यान बस पुढे सरकली आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, वाहनतळात उभ्या असलेल्या दोन मोटारसायकली आणि एका रिक्षाला बसची धडक बसली. या अपघातात पादचाऱ्याच्या दोन्ही मांड्यांना मार लागून रक्तस्त्राव झाला.
बस वाहकाने जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने मुलंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. बेस्टचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी जाऊन प्रकरणाची पाहणी केली. भांडुप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. तसेच ८ जून रोजी दादर प्लाझा येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ बेस्टच्या भाडेतत्वावरील बसचा अपघात झाला होता.
