मुंबई: भरधाव वेगात आलेल्या बेस्ट बसने १० ते १२ पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री भांडुप स्थानक परिसरात घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून आठ ते दहाजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
भांडुप पश्चिम स्थानकाबाहेरील बेस्ट डेपो परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. डेपोमधून बस बाहेर येत असताना चालकाचा बसवरील ताबा अचानक सुटला व बसने पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली. रेल्वे स्थानक परिसर असल्याने घटनेच्या वेळी तेथे पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. त्यामुळे अपघातात दहा ते बारा पादचारी जखमी झाले. त्यांना तात्काळ मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयात नेण्यात आले.
अपघातानंतर बरेच पादचारी रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले होते. भांडुप पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु, चार पादचाऱ्यांचा रुग्णालयात दाखल करण्यायापूर्वीच मृत्यू झाला, तर आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती
वर्षभरापूर्वी कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर देखील अशाच प्रकारे अपघात झाला होता. बेस्ट बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बसने तीस ते चाळीस पादचाऱ्यांना धडक दिली होती. त्या अपघातात सहा पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ९ डिसेंबर २०२४ रोजी ती घटना कुर्ला पश्चिम येथील पालिकेच्या एल वार्ड येथे घडली होती.
