मुंबई : गेल्या डिसेंबर महिन्यात भांडुप स्थानक परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघातातील आरोपी आणि बसचा चालक संतोष सावंत याला इलेक्ट्रिक बस कशी चालवायची याचे फारसे ज्ञान नव्हते. तरीही त्याने बस चालवण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय घेतला नसता तर अपघात घडला नसता आणि त्यात चारजणांचा मृत्यू झाला नसता, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारताना नोंदवले.

आरोपीला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण मिळालेले नाही, तरीही त्याने ही बस चालवण्याचा निर्णय घेतला. त्याला ही बस चालवण्याच्या तंत्राची प्राथमिक माहितीही नव्हती. त्यामुळे, इलेक्ट्रिक वाहन चालवण्याबाबत असलेल्या त्याच्या अज्ञानामुळे गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढते, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. हा काही किरकोळ अपघात नव्हता. आरोपीने हे वाहन चालवण्यास स्पष्ट नकार द्यालला हवा होता हेही न्यायालयाने अधोरेखीत केले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या ताफ्यातील, ओलेक्ट्रा ग्रीनटेक निर्मित नऊ मीटर लांबीची ही इलेक्ट्रिक बस सावंत (५२) चालवत होता. घटनेच्या दिवशी, २९ डिसेंबर २०२५ च्या रात्री भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ बस पोहोचली असता सावंत याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पादचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत चारजणांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले. तथापि, नवीन इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या चालकांच्या यादीत सावंत याचे नाव समाविष्ट नव्हते. योग्य प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्याची कायदेशीर जबाबदारी काही प्रमाणात कमी होते, असा युक्तिवाद सावंत याने जामिनाची मागणी करताना केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनतकर यांनी त्याला जामीन नाकारताना त्याचा युक्तिवाद फेटाळून लावला. सावंत याला अशा बस चालवण्याबाबत विभागाकडून कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही आणि बस चालवण्याच्या तंत्राची प्राथमिक माहितीही नसल्याची त्याला पूर्ण कल्पना होती. तरीही त्याने बस चालवण्याच निर्णय घेतला आणि बसला अनियंत्रित होऊ दिले व त्याचे गंभीर परिणाम घडू दिले, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

अशा घटनांमध्ये बचावासाठी एकमेकांवर दोषारोप

प्रशिक्षण न दिल्याबद्दल बेस्टकडे आक्षेप नोंदवण्याबाबत कर्मचाऱ्याने दाखवलेल्या निष्काळजीकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. वाहनाचा प्रचंड आकार आणि ते वाहन कसे चालवायचे याबद्दल आरोपीला असलेली अत्यल्प माहिती, यामुळे या गुन्ह्याची तीव्रता अधिकच वाढली आहे. इलेक्ट्रीक बस चालवण्यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा काही भाग सावंत याच्या किंवा बेस्ट प्रशासनाच्या दोषामुळे वगळला गेला होता. याचे अत्यंत भयानक परिणाम भोगावे लागले. मात्र, एखादी अशी दुर्घटना घडते, तेव्हा संबंधित सर्व व्यक्ती स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेकांवर दोषारोप करतात, असे ताशेरेही न्यायालयाने सावंतचा जामीन अर्ज फेटाळताना ओढले.