मुंबई: भांडुप येथील पक्षी उद्यानासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीआशिष शेलार यांनी सोमवारी दिली. या निर्णयामुळे पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
आशिष शेलार यांनी आज भांडुप येथील प्रस्तावित पक्षी उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी बोलताना शेलार यांनी पक्षी उद्यान प्रकल्पाबद्दल माहिती दिली. प्रकल्पामध्ये पक्षीनिरीक्षण केंद्रे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा, हरित क्षेत्र विकास, नैसर्गिक अधिवास संवर्धन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले.
या प्रकल्पामध्ये २.१६ किलोमीटर लांबीचा मॅग्रोव्ह नेचर ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्रे, व्ह्यूइंग डेक्स, बहुमजली वॉच टॉवर्स, बटरफ्लाय गार्डन, जेट्टी, नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आणि व्याख्यानगृह, बाह्य पार्किंग सुविधा तसेच इतर पर्यावरणपूरक पर्यटन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि नियोजन परिसंस्थेला कमीत कमी बाधा पोहोचेल अशा पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असेल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
भांडूप पक्षी उद्यान हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पक्षी शोध आणि निरीक्षण प्रणाली असलेले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सुमारे दीड किलोमीटर परिसरात रिअल-टाईम पक्षी निरीक्षण, एआय आधारित पक्षी ओळख प्रणाली, स्वयंचलित ट्रॅकिंग, इव्हेंट ॲनालिटिक्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक आणि जैवविविधता दस्तऐवजीकरण यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच डिजिटल लेन्स इंटिग्रेशन, केंद्रीकृत डेटा व्यवस्थापन, लाईव्ह सिंक्रोनायझेशन आणि परस्परसंवादी डिजिटल प्रणालीमुळे देश-विदेशातील पर्यटक, संशोधक, पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठरणार असल्याचा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
