मुंबई: भांडुपच्या एल.बी.एस. मार्गावरील काही भाग शनिवारी दुपारी अचानक खचला. रस्ता खचल्यामुळे झालेल्या खड्ड्यात एक टेंपो पडला असून या घटनेनंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
एलबीएस मार्गावरील एशियन पेंट कंपनी समोर शनिवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. मुख्य रस्त्यालगतच एका इमारतीचे बांधकाम सुरू असून यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यालगतची जमीन अचानक खचली. या ठिकाणी एक बस थांबा असून सुदैवाने घटनेच्या वेळी बस थांब्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.
रस्त्यालगत उभा असलेला एका टेम्पो खड्ड्यात कोसळला. तसेच येथील तीन झाडेही उन्मळून पडली. तसेच बांधकाम स्थळी विकासकाने उभारलेले कंटेनर कार्यालय या खड्यात पडले.
घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतले. खबरदारी म्हणून एल.बी.एस. मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
