मुंबई: दादागिरी करणाऱ्या १४ वर्षीय मुलाची त्याच्याच अल्पवयीन मित्रांनी हत्या करून त्याचा मृतदेह तलावात फेकल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
भांडुपमधील तुलशेतपाडा परिसरात वास्तव्यास असलेला सिद्धेश लोंढे (१४) इयत्ता आठवीत शिकत होता. सिद्धेश २२ फेब्रुवारीला खेळण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही. अखेर रात्री उशिरा त्याच्या कुटुंबीयांनी भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सिद्धेशचा शोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी मुलुंड येथील विहार तलावात एका मुलाचा मृतदेह मुलुंड पोलिसांना आढळला. हा मृतदेह सिद्धेशचा असल्याचे उघडकीस आले.
या परिसरातील मुले विहार तलावात पोहण्यासाठी येतात. त्यामुळे सिद्धेशचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सिद्धेशचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आले. त्यादृष्टीने भांडुप पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
या परिसरातील एका रहिवाशाने घटनेच्या दिवशी आरोपी मित्रासोबत सिद्धेशला पाहिले होते. त्यामुळे त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ या मित्राला ताब्यात घेतले. तपासात त्याने सिद्धेश पाण्यात बुडाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या साथीदारांचीही कसून चौकशी केली असता आपणच सिद्धेशची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
सिद्धेश नेहमीच ददागिरी करत होता. त्यामुळे त्याला बेदम मारहाण करण्याचा डाव या तिन्ही मित्रांनी आखला होता. घटनेच्या दिवशी तिन्ही मित्र त्याला तलावाजवळ घेऊन आले. यावेळी तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. यावेळी यातील एका मित्राने त्याच्या डोक्यात काठी मारल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला तलावात फेकून पळ काढला. भांडुप पोलिसांनी या तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
