मुंबई: लग्नात भोजनानंतर नवविवाहित दाम्पत्यासह वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री भांडुप-नाहूर भागात घडली आहे. या सर्वांना मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये १ नोव्हेंबर रोजी एक लग्न समारंभ होता. लग्नसमारंभामध्ये जवळपास ४०० लोक जेवले होते. शेवटच्या पंक्तीमध्ये जेवणाला बसलेल्या २७ ते ३० लोकांना विषबाधा झाली. या लोकांना पोटात थोडे दुखण्याबरोबच उलटी, जुलाबचा त्रास होऊ लागला. त्रास वाढू लागल्याने रात्री ११ च्या सुमारास रुग्णांना मुलुंडच्या एमटी अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. तर काही जणांना मुलुंडच्या कामगार रुग्णालयात आणि विक्रोळी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल रुग्णांपैकी दाेन लहान मुले, नऊ पुरुष आणि ११ महिला आहेत. यातील एका महिलाने स्वत:हून सुटी घेऊन घरी गेली आहे. तर अन्य सर्व रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम.टी. अगरवाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजूसिंग राठोड यांनी दिली.
सर्व रुग्णांवर वेळेत वैद्यकीय उपचार सुरू झाल्याने त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे. यातील काही जणांना रात्री घरी पाठवण्यात आले असून इतर सर्वांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी जेवणाचे कंत्राट दिलेल्या केटरिंगच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.
