मुंबई : मुंबई महापालिकेने भांडुप रेल्वेस्थानकात रेल्वेरुळांवर जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा हा महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प असून या पुलामुळे वीर सावरकर मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग थेट जोडले जाणार आहेत. या पुलामुळे जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, तसेच वाहनचालकांना आता पाच किमीचा वळसा घालावा लागतो, तो टळणार आहे. मात्र या पुलासाठी अजून किमान वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भांडुप स्थानकाच्या पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा मार्ग सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेवरील उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या पुलाच्या कामाची नुकतीच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. पादचारी रेल्वे प्रवासी, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी उड्डाणपुलावर पदपथ करावा, पुलाचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.
प्रवासाचा वेळ निम्मा होणार
हा पूल वीर सावरकर मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग यांना थेट जोडणार आहे. भांडुप परिसरात पूर्व – पश्चिम वाहतुकीसाठी सध्या थेट मार्ग नसल्याने नागरिकांना मोठा वळसा घेऊन जावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. भांडुप पूर्व आणि पश्चिम परिसरात थेट जोडणी निर्माण करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे आणि जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्ग (जेव्हीएलआर) व इतर मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे हा यामागील प्रमुख हेतू आहे. सध्या अनेक नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी सुमारे ५ किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागतो. नवीन पुलामुळे प्रवासाचा वेळ जवळपास निम्मा होण्याची शक्यता आहे.
आयआयटीची मदत घेणार
हा पूल सावरकर मार्गावर ज्या ठिकाणी उतरणार आहे, त्या ठिकाणी जोडणी होताना तीव्र वळण निर्माण होणार आहे. उड्डाणपुलाचा आराखडा तांत्रिक मानकांनुसार तयार करण्यात आला असला तरी आयआयटी पवई या संस्थेच्या (IIT) तज्ज्ञांकडून त्याची पडताळणी करावी. वाहतुकीचे विश्लेषण करण्यासाठी वाहतूक अनुकरण अभ्यास करावा, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भांडुप रेल्वे उड्डाणपूलाविषयी…
भांडुप रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून जाणाऱ्या या पुलाची एकूण लांबी सुमारे ५३० मीटर असून रेल्वेच्या हद्दीतील भाग सुमारे ८९ मीटर इतका आहे. रस्त्याची रुंदी महानगरपालिका हद्दीत ११.५० मीटर आणि रेल्वे भागात १५.६० इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १० ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यादेश (Work Order) देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कामाला २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली. सध्या प्रकल्पाची सुमारे ३० टक्के भौतिक प्रगती साध्य झाली आहे.
अडथळे दूर करणार
पुलासाठी २७.४५ मीटर रस्तारेषेसाठी आवश्यक असलेल्या ‘सॉल्ट पॅन’ जमिनीचे संपादन विकास नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहे. पुलाच्या पूर्व बाजूस जलवाहिन्या अडथळा ठरत आहेत. या जलवाहिन्या हलविण्याचे काम जल अभियंता विभागामार्फत सुरू आहे.- अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त
