मुंबई : १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परिचारिका (नर्सेस) व्यवसायाबाबत दाखविण्यात आलेल्या काही संवाद आणि दृश्यांवर महाराष्ट्र गर्व्हेमेंट नर्सेस फेडरेशनने (एमजीएनएफ) तीव्र आक्षेप नोंदविला आहे. या संदर्भात राज्य सरकार, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता यांनी निवेदन देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचे पुनरावलोकन करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
२६/११ च्या हल्ल्यामध्ये दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या साथीदाराने मुंबईतील कामा रुग्णालयामध्ये केलेल्या हल्ल्याच्या वेळी रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांचे प्राण वाचवले. या कथेवर आधारित अभिनेत्री कंगना रनौत हिने ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे काही चित्रिकरण कामा रुग्णालयामध्येही करण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये परिचारिकांच्या क्षेत्राशी संबंधित काही आक्षेपार्ह संवाद आणि दृश्य दाखविण्यात आली आहे. संबंधित दृश्ये आणि संवाद परिचारिकांचा अपमान करणारे असल्याने महाराष्ट्र गर्व्हेमेंट नर्सेस फेडरेशनने त्यास आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र गर्व्हेमेंट नर्सेस फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, भारतीय परिचर्या परिषद, महाराष्ट्र परिचर्या परिषद, मणिकर्णिका फिल्म प्रायव्हेट लिमिटेड आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तपाडिया यांना निवेदन देऊन संवाद व दृश्य वगळण्याची विनंती केली आहे.
परिषदेच्या मागण्या
परिचारिका हा आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रुग्णसेवा, करुणा, समर्पण आणि व्यावसायिकतेच्या बळावर परिचारिका समाजाच्या आरोग्यसेवेत दिवस-रात्र कार्यरत असतात. अशा परिस्थितीत नर्सेसविषयी अवमानकारक, उपहासात्मक, रूढीवादी किंवा प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे चित्रण केल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे चित्रपटातील परिचारिकांविषयीच्या आशयाचे सखोल परीक्षण करणे, आक्षेपार्ह अथवा दिशाभूल करणारे संवाद आणि दृश्ये वगळणे किंवा त्यात आवश्यक सुधारणा करणे, नर्सिंग क्षेत्रातील प्रतिनिधींना चित्रपट दाखवून त्यांची मते विचारात घेणे, परिचारिकांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी मान्यताप्राप्त नर्सिंग संघटनांच्या हरकतींचा विचार करणे अशा मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
परिचारिकांचा संताप
२६/११ च्या हल्ल्यामध्ये परिचारिकांनी दाखवलेल्या धैर्यावर चित्रपट येत असल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र या ट्रेलरमध्ये जे आक्षेपार्ह संवाद दाखविण्यात आले आहेत. ते पूर्णत: अमान्य आहेत. या चित्रपटामध्ये आमच्या व्यवसायाबद्दल अनादर दाखविण्यात आला आहे. याला आमचा विरोध आहे, असे कामा रुग्णालयातील परिचारिका सीमा ढोबळे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे मी १५ वर्षांपासून कामा रुग्णालयामध्ये कार्यरत आहे. परिचारिकांचे जीवन समाजामध्ये साधे आणि शोभनीय असते. मात्र चित्रपटामध्ये फारच आक्षेपार्ह विधाने केली आहेत. आम्हाला रुग्णांची सेवा करताना करुणा आणि प्रेम शिकवले जाते. आम्ही सहकाऱ्यांची मस्करी करतानाही इतक्या खालच्या स्तरावर बोलत नाही, आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे आम्ही कधीही मान्य करणार नाही. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो आमच्या संघटनेला व परिचारिकांना दाखविण्यात यावा. त्यातील आक्षेपार्ह विधाने काढून नंतरच चित्रपट प्रदर्शित करण्यात यावे, अशी मागणी परिचारिका पूनम गायकवाड यांनी केली.
२६/११ च्या हल्ल्यावेळी कामा रुग्णालयामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या परिचारिका अंजली कुलथे यांनी मात्र या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
डॉक्टर आणि परिचारिकांचे क्षेत्र हे आदर्श क्षेत्र आहे. परिचारिकांना संसदीय भाषेतच संवाद साधत असतात. चित्रपटाच्या ट्रेलमध्ये वापरण्यात आलेली भाषा त्या कधीच वापरत नाहीत. या चित्रपटामुळे परिचारिकांचे नाव खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावा. त्यामधील अपशब्द वगळण्यात यावेत.- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
