लोकसत्ता प्रतिनिधी
अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर लोकप्रिय असलेले ‘हिंग्लिश’ नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध ‘ॲड गुरु’ भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इंग्रजीत गाजलेलं नाटक आता मराठमोळ्या ढंगात
भरत दाभोळकर यांनी पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांसारख्या दिग्गज मराठी लेखकांची नाटकं इंग्रजीत नेली आणि ती गाजवली. अनेकदा हलकेफुलके विषय घेऊन स्वतः दाभोळकरांनीही आपल्या लेखन-दिग्दर्शनाने हिन्दी, इंग्रजी, गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या वेळीही ते स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अजरामर केले होते. आता हेच नाटक मराठीत आणण्याचे धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केले आहे.
मराठमोळं कुटुंब पाकिस्तानात! मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आले होते, मात्र मराठी प्रेक्षकांची नस ओळखून लेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. भरत दाभोळकर म्हणतात, ‘इंटरनेटमुळे आजच्या पिढीला जगभरातील गोष्टी ठाऊक आहेत. अशातच एखादं मराठमोळं कुटुंब जेव्हा पाकिस्तानात जातं, तेव्हा तिथे उडणारी त्यांची धांदल आणि तो साहसी प्रवास पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’ या नाटकाच्या निमित्ताने भरत दाभोळकर आणि अभिनेते-निर्माते आकाश भडसावळे ही जोडी एकत्र आली आहे. तसंच, दाभोळकर यांच्याबरोबर त्यांचे इंग्लिश-हिंदी नाटकातील अनेक वर्षांचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आझाद ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर कमाल करताना दिसेल.
‘जेव्हा मराठी माणूस ओटीटीवरील साचेबद्ध आशय पाहून कंटाळतो, तेव्हा तो ताज्या दमाच्या अनुभवासाठी नाटकाकडे वळतो’ असं भरत दाभोळकर यांनी सांगितलं. ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबईत १० एप्रिल २०२६ रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे, तर पुण्यात १८ एप्रिल २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहेत.
