मुंबई : केंद्र सरकारच्या ‘भारत इनोव्हेट्स’ उपक्रमाला येत्या काळात संस्थात्मक स्वरूप देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. देशातील नवोन्मेष परिसंस्था बळकट करण्यासाठी सरकारची दीर्घकालीन बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते आयआयटी मुंबई येथे आयोजित ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट’च्या समारोप सत्रात बोलत होते.

‘भारत इनोव्हेट्स’ उपक्रम भारताच्या जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून होत असलेल्या उदयाचे प्रतीक असल्याचे नमूद करून त्या व्यासपीठाने स्टार्टअप, संशोधक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणून सहकार्य व वाढीसाठी संधी निर्माण केल्याचे प्रधान यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुमारे १७५ गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत सहभागी झाले होते.

यावेळी प्रधान यांनी विविध प्रदर्शन कक्षांना भेट देऊन ऊर्जा, हवामान व शाश्वतता, सेमिकंडक्टर, अवकाश व संरक्षण, आरोग्य, जैवतंत्रज्ञान, गतिशीलता व स्मार्ट शहरे तसेच प्रगत संगणन या क्षेत्रातील नवोन्मेषकांशी संवाद साधला. हा प्री-समिट ‘भारत इनोव्हेट्स २०२६’साठी पूर्वतयारी ठरला असून, हा मुख्य कार्यक्रम फ्रान्समध्ये होणार आहे. उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढविणे आणि डीप-टेक नवोन्मेषाला चालना देणे यावर यावेळी भर देण्यात आला, असे प्रधान यांनी सांगितले. उदयोन्मुख उपक्रमांना वाढीसाठी सातत्यपूर्ण गुंतवणुकीची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

देशभरातील संशोधनाधारित नवकल्पना जागतिक स्तरावर नेण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगून नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण, गुंतवणूक आकर्षित करणे आणि दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करणे यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला के. राधाकृष्णन, विनीत जोशी, अभय करंदीकर आणि आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अन्य विद्यापीठांसोबत इन्क्युबेशन केंद्र उभारणार

आयआयटी मुंबईच्या परिसरात नवोन्मेष व स्टार्टअप संस्कृती अधिक बळकट करण्याचे नियोजन सुरू असल्याचे संचालक शिरीष केदारे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि सीओईपी टेक्नाेलॉजीकल विद्यापीठ यासारख्या संस्थांच्या सहकार्याने सह-इन्क्युबेशन केंद्र उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या समिटमध्ये तीन हजारांहून अधिक अर्जांमधून निवडलेल्या १३७ डीप-टेक स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत साहित्य, जैवतंत्रज्ञान आणि स्वच्छ तंत्रज्ञान या क्षेत्रांतील नवकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. या सत्रांना गुंतवणूकदार आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित राहून सहकार्य आणि निधीच्या संधींचा शोध घेत होते.

नवोन्मेष बाजारपेठेपर्यंत पोहचवणे आवश्यक

भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे तर ‘ग्लोबल साऊथ’मधील इतर देशांसाठीही किफायतशीर व विस्तारक्षम उपाय विकसित करण्यास सक्षम असल्याचे प्रधान यांनी सांगितले. नवोन्मेष प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता बाजारपेठेत पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवड झालेल्या स्टार्टअप्सना आता फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘भारत इनोव्हेट्स २०२६’ या जागतिक प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, यामुळे तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात देशाची भूमिका अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.