मुंबई : ओला, उबर, रॅपिडो कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, गर्दीच्या वेळेतील (पीक अवर्समधील) अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे यातून ‘भारत’ टॅक्सीमुळे सर्वसामान्यांची सुटका होत आहे. केंद्र सरकारच्या भारत टॅक्सीला महामुंबईत चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १ लाख चालकांनी नोंदणी केली आहे.

भारत टॅक्सीची आठवड्याला २९ टक्यांनी मागणी वाढत आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने खासगी अॅग्रीगेटर कंपन्यांपेक्षा वेगळ्या चालक-केंद्रीत सहकारी तत्त्वावर भारत टॅक्सीची निर्मिती केली आहे. चालकांना केवळ सेवा पुरवठादार नाही, तर सहकारी संस्थेतील भागीदार करण्याची भारत टॅक्सीची संकल्पना आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू आहे. ही सेवा पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.

सुरुवातीच्या पहिल्या १.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी ३१ रुपये तर त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये दर आकारण्यात येतो. त्यामुळे अचानक वाढणाऱ्या भाड्याच्या त्रासापासून प्रवाशांना दिलासा मिळतो. कोणतेही छुपे शुल्क नाही, कंपन्यांचा वाटा (कमिशन) नाही आणि चालकांना अपघाती विमा या तीन प्रमुख लाभांमुळे चालक भारत टॅक्सीकडे वळत आहेत. कमिशन नसल्याने प्रवासी सेवेतील उत्पन्नाचा मोठा भाग हा चालकांकडे राहतो.

अतिरिक्त भाडे नाही, ना भाडे नाकारण्याची कटकट

अनेकदा कार्यालयाच्या वेळेत, रुग्णालयात जाताना, वाहतूक कोंडी असलेल्या भागात टॅक्सी बुक करताना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खाजगी कंपन्या परिस्थितीचा फायदा उचलून सर्ज प्रायसिंगच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळतात किंवा चालक भाडे स्वीकारत नाहीत. मात्र केंद्र सरकारच्या मदतीने सुरू झालेल्या भारत टॅक्सी सेवेमध्ये भाडे पूर्णपणे निश्चित असणार आहे. पाऊस असो किंवा भीषण वाहतूक कोंडी, यामध्ये दरात कोणताही बदल होत नाही.

चालकच मालक

भारत टॅक्सी ही सेवा केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यासाठी ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’ या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत ही सेवा पूर्णपणे सहकारी संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते. त्यामुळे चालक हे केवळ कर्मचारी नसून ते या संस्थेचे थेट मालकही आहेत.

चालकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांमुळे भारत टॅक्सी मुंबई,पुण्यात लोकप्रिय होत आहे. चालकांचा एक लाखांचा टप्पा पार झाला आहे. आतापर्यत सुमारे अडीच लाख प्रवाशांनी भारत टॅक्सीने प्रवास केला आहे.भारत टॅक्सीचा प्रवास प्रवाशांना परवडणार आणि किफायतशीर आहे. देशाचा विचार केला आतापर्यत ८५ कोटी ५९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. – मो. अखत्तर खान, शहर प्रमुख (मुंबई, नवी मुंबई, ठाणे), भारत टॅक्सी