दुष्काळी राज्याच्या राजधानीत..
न्यायालयाच्या र्निबधांमुळे पण वरकरणी दुष्काळाचे कारण देत दहीहंडी उत्सवातून प्रस्थापित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघार घेतली असतानाच मुंबईत जम बसविण्याच्या धडपडीत भारतीय जनता पक्षाने शहरभर तब्बल दीडशे दहीहंडी उत्सव आयोजित करण्याचा विडा उचलला आहे. राज्यात अनेक शहरांत पाणीटंचाई उग्र होत असताना आणि दुष्काळ पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले असताना त्या दुष्काळाची तमा न बाळगता मुंबई भाजपने दहीहंडीचे थर रचण्याचा चंग बांधला आहे.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देतानाच शहरातील विविध उपनगरांत तब्बल दीडशे दहीहंडी उत्सवांचे आयोजन करत भाजपने मंदीत संधी शोधली आहे.
गेल्या काही वर्षांत दहीहंडी फोडण्यासाठी थरांची स्पर्धा सुरू झाल्याने उत्सवाची लोकप्रियता वाढत होती. याचा पुरेपूर फायदा उचलत परंपरागत शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीने उत्सवात राजकीय आणि सेलिब्रेटींचे रंग भरले. जोडीला डीजेचा ढणढणाट आला.
ठाण्यात जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेल्या दहीहंडीचा लाखोंच्या बक्षिसांमुळे बोलबाला झाल्यानंतर मुंबईत सचिन अहिर, राम कदम, कर्णा बाळा, पांडुरंग सकपाळ यांनी दहीहंडीचे थर आणखी उंच नेले.
मोठे चित्रपट कलावंतही हजेरी लावू लागल्याने दहीहंडीत राजकीय नेत्यांचा सहभाग वाढू लागला. काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्या बोरिवलीतील आणि कृष्णा हेगडे यांच्या पार्ले येथील हंडीनेही प्रसिद्धीचे थर रचले. या सगळ्यात भाजपचे नाव फारसे चर्चेत नव्हते. अपवाद मनसेतून भाजपच्या गोटात दाखल झालेले राम कदम यांचा. मात्र वर्षांगणिक फुगत चाललेल्या या दिमाखी फुग्यातील हवा न्यायालयाने काढून घेतली.
दहीहंडीच्या उंचीवर वीस फुटांचे र्निबध, डीजेंच्या ढणढणाटाला बंदी आणि लहान गोविंदांवर चाप लावल्याने आधी राजकीय पक्षांनी थयथयाट केला. मात्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काहीच करता येत नसल्याने दुष्काळाचे कारण सांगत या उत्सवातील एकेक तयारीचा गडी मागे फिरला. सचिन अहिर, संजय निरुपम, जितेंद्र आव्हाड आणि कृष्णा हेगडे यांनी दहीहंडी उत्सव रद्द केल्याचे जाहीर केले. या ‘संधी’चा फायदा घेत भाजपने प्रसिद्धीचे दहीलोणी खायची धडपड चालवली आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहतीत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्यातर्फे मुख्य दहीहंडी होणार आहे. राज्य दुष्काळाने, आर्थिक प्रश्नांनी गांजले असतानाच या उत्सवात भाजपचे मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह सेलिब्रेटी उजळ माथ्याने हजेरी लावणार आहेत. या उत्सवात चारशे पथके सहभागी होणार असल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे.
या दहीहंडीसह वांद्रे येथे तीस हंडय़ा, अंधेरी, दिंडोशी, दहिसर, मागाठाणे, कांदिवली, वर्सोवा, गोरेगाव, मुलुंड, घाटकोपर, विलेपार्ले, चांदिवली, कालिना, धारावी, वडाळा, शीव, माहीम, शिवडी येथे प्रत्येकी दोन ते सहा हंडय़ा लावल्या जाणार आहेत. यापैकी १२ ठिकाणी मोठय़ा हंडय़ा लावल्या जाणार आहेत. भाजपची ही खेळी लक्षात आल्याने शिवसेनाही परंपरागत उत्सवावरील ताबा घट्ट करायला सरसावत आहे.

वाचकांना आवाहन..
ढणढणाटी दहीहंडय़ा टळल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच सत्ताधारी भाजप दहीहंडीसाठी सरसावला आहे. गणेशोत्सवातील मंडप व ध्वनीप्रदूषणावरही न्यायालयाचे र्निबध असले तरी हे र्निबध पाळले जातात की नाही, यावर आपलीही नजर हवीच. जर आपल्या भागात नियमभंग करणारी दहीहंडी झाली किंवा गणेशोत्सवासाठी रस्ते अडवले गेले तर त्याची माहिती व छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या खालील ई-मेलवर पाठवावीत.