मुंबई : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत असताना गाडीचा हॉर्न वाजल्याचे निमित्त झाले आणि पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद सोमवारी एका एक्सवरील संदेशाने चव्हाट्यावर आले. जाहिरपणे परस्परांना, तो कोण लागून गेला, वैफल्यग्रस्त म्हणेपर्यंत या नेत्यांची मजल गेली.

या वादाला तोंड फुटले ते आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका एक्सवरील संदेशामुळे. सोमवारी सकाळी भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ नार्वेकर यांनी प्रसिद्ध केला. पक्षाच्या वर्धापन दिनी १९ जूनला कार्यकर्त्यांच्या गर्दीत जाधव एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना एका वाहनाचा हॉर्न सातत्याने वाजत होता. ते वाहन नार्वेकर यांचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले तेव्हा, नार्वेकर कोण लागून गेला, असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. जाधव यांच्या या व्हिडिओसोबत इंग्रजीत वैफल्य (फस्ट्रेशन) असे शीर्षक देत नार्वेकर यांनी जाधव यांच्यावर खोचक टिपण्णी केली.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपया उद्धव ठाकरे यांच्या पत्रावर (विरोधी पक्षनेते निवडीबाबतच्या) लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कारण, त्यांच्या मानसिक तणावाचा मुख्य भार आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांवर पडत आहे, अशा शब्दांत त्यांनी जाधव यांना डिवचले. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी करणारे पत्र अध्यक्षांना लिहिले आहे. त्याचा संदर्भ या संदेशाला होता. साहजिकच या प्रकारामुळे भास्कर जाधव खवळले. त्यांनी सकाळी विधानसभा अधिवेशनादरम्यान पत्रकारांना प्रतिक्रिया देऊन आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आणि नार्वेकर यांचा समाचारही घेतला.

नार्वेकर माझ्या डोक्यात बसले आहे…

नार्वेकर म्हटले की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. त्यामुळे गाडीचा हॉर्न कुणा नार्वेकरचा वाजतो आहे म्हटल्यावर मी क्षणात नार्वेकर कोण मोठा लागून गेला, असे बोलून गेलो, असा खुलासा जाधव यांनी केला. कार्यकर्त्यांची गर्दी असली की नेत्यांनी त्यांच्यासोबत चार पावले चालले पाहिजे, अशी आठवण जाधव यांनी करून दिली. तसेच, माझे मित्र मिलिंद नार्वेकर कणखर नेते असून ते सर्व पक्षांशी चांगले संबंध ठेवून आहेत. असे वाटते, माझी विरोधी पक्षनेतेपदी निवड करून दिली गेली नाही, याचे दुख त्यांना अधिक आहे. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणीवस यांचा शब्द अंतिम आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वपक्षीय संबंधांचा उपयोग करून विरोधी पक्षनेते पदाचा वाद सोडवावा, अशी बोचरी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या दिवशीच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून ही हमरीतुमरी रंगल्याचे चित्र होते, हे विशेष.