मुंबई : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सोळा फळपिकांचा समावेश आहे. पण, द्राक्ष पिकाचा समावेश नव्हता. बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत द्राक्ष पिकाचा योजनेत समावेश करा. त्या बाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयुक्तांना दिले. हा निर्णय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. द्राक्ष निर्यात आणि संशोधनाला आर्थिक मदत देण्याची घोषणाही भरणे यांनी केली.
मंत्रालयात आयोजित बैठकीत द्राक्ष पिकाचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार रोहित पाटील, कृषी आयुक्त सूरज मांढरे, संचालक अंकुश माने, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ मस्के आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येणार असून, प्रादेशिक गरजेनुसार योग्य वाणांचा समावेश केला जाईल. द्राक्ष निर्यातीमुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून, निर्यातक्षम पिकांना शासन सहकार्य करणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
तासगावात आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
तासगावमध्ये (जि. सांगली) टेबल ग्रेप्स ज्यूस पार्क व तासगाव आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (काढणी पश्चात तंत्रज्ञान) स्थापन करण्याबाबत कृषिमंत्री यांनी सकारात्मक तयारी दर्शवत कृषी आयुक्त यांच्याशी चर्चा करून कॅलिफोर्निया येथील संशोधन केंद्राशी चर्चा करून नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.
‘पोकरा’तील तांत्रिक अडचणी दूर करणार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) अंमलबजावणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करा. योजना शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांना सुलभ आणि जलद पद्धतीने लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केले पाहिजे, असे निर्देश भरणे यांनी दिले. दरम्यान बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पासाठी प्रथम अनुदान हप्ता वितरणास मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करण्यात आली. अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता शेतकरी व उत्पादक संस्थांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्या, असे निर्देशही भरणे यांनी दिले.
