मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) भाईंदर ते विरार मेट्रो १३ मार्गिकेचा सुधारित आराखडा नुकताच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार मेट्रो १३ मार्गिका २४.९०० किमीची असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, २४.९०० किमी मार्गिकेपैकी ३.२५० किमीची मार्गिका भूमिगत असणार असून उर्वरित २१.६५० किमीची मार्गिका उन्नत असणार आहे. वसई ते नालासोपारादरम्यानच्या ३.२५० किमी अंतरावर भूमिगत मेट्रो धावणार आहे. त्यामुळे वसई-विरारवासीयांसह भाईंदरवासीयांनाही भविष्यात भुयारी मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
म्हणून सुधारित आराखड्याची गरज मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएकडून ३३७ किमीचा मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यात मेट्रो १३ मार्गिकेचा समावेश आहे. या मार्गिकेचा आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) देण्यात आले आहे. त्यानुसार २०२०-२१ मध्ये डीएमआरसीने मेट्रो १३ मार्गिकेचा सविस्तर आराखडा तयार केला. या मार्गिकेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी घेतल्यानंतर आराखड्यात मोठ्या सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली.
कारण आराखडा तयार करण्यात आलेला कालावधी आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे. २०२०-२१ नंतर भाईंदर-विरारदरम्यान बांधकामांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एमएमआरडीएने प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाहणी केली असता वसई ते नालासोपारादरम्यान उन्नत मार्गिका नेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. उन्नत मेट्रो न्यायची झाल्यास त्यासाठी मोठ्या संख्येने विस्थापन करावे लागेल. हे विस्थापन टाळून मेट्रो पुढे विरारपर्यंत कशी नेता येईल यासाठी डीएमआरसीला सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश एमएमआरडीएने दिले होते.
त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा आता राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. १७ हजार ७२४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित सुधारित आराखड्यानुसार मेट्रो १३ मार्गिका २४.९०० किमी लांबीची असणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथून ही मार्गिका सुरू होऊन डोंगरपाडा येथे येऊन संपणार आहे. २४.९०० किमीच्या मार्गिकेपैकी २१.६५० किमीची मार्गिका उन्नत असणार आहे, तर ३.२५० किमीचा भाग भूमिगत असणार आहे.
या मार्गिकेत एकूण १७ मेट्रो स्थानके असणार असून त्यापैकी १४ स्थानके उन्नत तर तीन स्थानके भूमिगत असणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हिव्हीएमसी फायर ब्रिगेड स्टेशनपासून ते नालासोपारा पश्चिमदरम्यान मेट्रो भूमिगत असणार आहे. व्हिव्हीएमसी फायर ब्रिगेड स्टेशन, अचोळे गाव आणि नालासोपारा पश्चिम अशी तीन स्थानके भूमिगत असणार आहेत. या मेट्रो १३ मार्गिकेच्या बांधकामासाठी १७ हजार ७२४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आता या मार्गिकेचा सुधारित आराखडा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून या मार्गिकेच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, सुधारित आराखड्यानुसार या मार्गिकेत नायगाव खाडीदरम्यान दुमजली पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या खालच्या स्तरावरून वाहने, तर वरच्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे. हा राज्यातील पहिला दुमजली खाडी पूल ठरेल, असा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएकडून केला जात आहे.
