मुंबई : भाईंदरमधील ६,९०० चौरस मीटर जमिनीचा भाग ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’साठी (एमटीएनएल) संपादित केल्यानंतर ३७ वर्षांनी, या जागेसाठी जमीनमालकांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला दिले. मालकांच्या घटनात्मक मालमत्तेच्या अधिकाराची दखल घेऊन न्यायालयाने हे आदेश दिले. तसेच, १९८९ पासून या जमिनीचा ताबा एमटीएनएलकडे होता आणि त्यांनीच जमीन मालकांना नुकसानभरपाई द्यावी, असेही स्पष्ट केले.
याचिका दाखल करण्यात आली त्या वर्षीचे, म्हणजेच २००५ चे जमिनीचे दर विचारात घेऊन राज्य सरकारद्वारे ही रक्कम निश्चित केली जाईल. त्यामुळे, या नुकसानभरपाईची रक्कम मोठी असण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांना संबंधित जमिनीपासून वंचित ठेवले जाणार असेल, तर कायद्यानुसार त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे, याची सुरुवातीपासूनच, संबंधित अधिकारी तसेच एमटीएनएलला जाणीव होती. तथापि, १७ एप्रिल १९८९ रोजी याचिकाकर्त्यांचा या जमिनीवरील ताबा गेल्यापासून ते आजतागायत त्यांना नुकसानभरपाईपोटी कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही याकडेही न्यायालयाने एमटीएनएलला उपरोक्त आदेश देताना लक्ष वेधले.
चिराग शशिकांत शहा आणि इतरांनी ही जमीन १९८२ मध्ये तिचे तत्कालीन मालक एव्हलिन पॉल परेरा यांच्याकडून खरेदी केली होती. योग्य नुकसानभरपाई किंवा जमीन परत मिळवण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात २००५ मध्ये याचिका दाखल केली होती. या जमिनीसंदर्भात दोन प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आल्या होत्या. त्यातील एक, जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत आणि दुसरी शहरी जमीन (कमाल मर्यादा आणि नियमन) कायद्यांतर्गत राबवण्यात आली. हे दोन्ही कायदे नंतरच्या काळात रद्द करण्यात आले. राज्य सरकारने १९८२ मध्ये जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत ही जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना काढली होती. त्यानंतर, १९८४ मध्ये, शहरी जमीन कायद्यांतर्गत सक्षम अधिकारी असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी भाईंदरमधील याचिकाकर्त्यांच्या जमिनीपैकी २९,९३९ चौरस मीटर जमीन ””अतिरिक्त”” म्हणून घोषित केली होती.
दरम्यान, एका दिवाणी दाव्यात, ६,९०० चौरस मीटर जमीन एमटीएनएलच्या फायद्यासाठी संपादित करण्यात आली होती आणि त्यासाठी प्राधिकरणाने विशेष भूसंपादन अधिकाऱ्याकडे ९.१३ लाख रुपये जमा केले होते हे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. ठाण्यातील दिवाणी न्यायालयात, याचिकाकर्त्यांनी एमटीएनएलसाठी निश्चित केलेली जमीन हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली. मात्र ही सहमती शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्यांतर्गत अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या उर्वरित जमिनीबाबतचा ””यथास्थिती””चा आदेश उठवण्याच्या अटीवर देण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या.
जमीन मालकांनी १९९२ मध्ये अपिलीय प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान दिले. या निर्णयात, त्यांना केवळ शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्यांतर्गतच नुकसानभरपाईचा दावा करता येईल आणि भूसंपादन कायद्यांतर्गत नाही, असे नमूद करण्यात आले होते. पुढे, भूसंपादन कायद्यांतर्गत जमीन संपादित करण्याची आता आवश्यकता नाही, असे सांगून विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने एमटीएनएलकडून जमा केलेली ९.०८ लाख रुपयांची रक्कम १९९९ मध्ये परत केली. सरकारी अधिकाऱ्यांनी २००३ मध्ये ६,९०० चौरस मीटर जमीन शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्यांतर्गतच्या अतिरिक्त जमिनीच्या यादीतून वगळली आणि २००५ मध्ये याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जमीन परत मिळण्याची किंवा योग्य नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली. दरम्यानच्या काळात, न्यायालयाने एमटीएनएलला याचिकाकर्त्यांच्या नुकसानभरपाईच्या दाव्याच्या अनुषंगाने पाच लाख रुपये न्यायालयात जमा करण्यास सांगितले.
