मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या सभा किंवा निदर्शनांमध्ये समाजविघातक शक्ती घुसखोरी करणार नाही याची खबरदारी घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असते, अशी साक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर गुरुवारी दिली.

निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल अध्यक्ष असलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांची साक्ष झाली. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्याची चौकशी द्विसदस्यीय आयोगाकडून सुरू आहे. भीमा कोरेगाव येथील हिंसाचार आटोक्यात आणण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली. पोलिसांचे अपयश होते. घटनेच्या दोन दिवस आधी समाज माध्यमांवर चुकीची माहिती पसरली होती. त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातूनच समाजविघातक तत्त्वांचा हेतू सफल झाला, असे पवार यांनी सांगितले.

वडू बद्रुकमध्ये हिंसाचार झाला तेथे काही लोक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत होते अशी आपली माहिती आहे, असे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ३१ डिसेंबरला पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार याची गल्लत करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आयोगाने पवारांना १० प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना पवारांनी उत्तरे दिली. या घटनेबद्दल आपल्याला पूर्वकल्पना नव्हती, असेही पवारांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चौकशीसाठी पाचारण करावे का, या प्रश्नावर पवारांनी, हा आयोगाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. भीमा कोरेगावमधील हिंसाचार व त्यानंतर करण्यात आलेले महाराष्ट्र बंदचे आवाहन या साऱ्यांना कोण जबाबदार आहे या प्रश्नावर हे प्रकरण सध्या न्यायप्रवीष्ट असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. देशद्रोहाच्या कलमाला पवारांनी विरोध दर्शविला. या सदंर्भात राज्यसभेचा खासदार म्हणून आपण संसदेत आवाज उठवू असेही त्यांनी सांगितले.आज, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही पवारांची साक्ष होणार आहे.

देशद्रोहाच्या कलमाला विरोध

देशद्रोहाच्या कलमाला पवारांनी विरोध दर्शविला. या सदंर्भात राज्यसभेचा खासदार म्हणून आपण संसदेत आवाज उठवू असेही त्यांनी सांगितले. आज, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही पवारांची साक्ष होणार आहे.

पवार, प्रकाश आंबेडकरांनी माफी मागावी; सांगलीतील युवा शिवप्रतिष्ठानची मागणी

सांगली : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्या कथित सहभागाबाबत चौकशी आयोगासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ठोस माहिती दिली नाही. तपास यंत्रणांनीही भिडे यांना निर्दोष ठरविले असल्याने पवार आणि आंबेडकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी युवा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

भीमा कोरेगाव दंगल घडली त्या वेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी या दंगलीमध्ये भिडे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, तर पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांचा यामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता. मात्र, तपास यंत्रणांनी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.

या दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगापुढे पवार आणि आंबेडकर यांनी भिडे यांच्या सहभागाबाबत कोणतेही ठोस पुरावे अथवा म्हणणे मांडले नाही. यामुळे संदिग्ध वक्तव्य करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची विशेषत: दलित समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.