मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या वाढत्या ताफ्यासाठी आणि लोकलच्या देखभाल-दुरुस्तीचा भार कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भिवपुरी आणि वाणगाव लोकल कारशेड प्रकल्पांना मंजुरी मिळून सात वर्षांचा कालावधी उलटला तरी दोन्ही कारशेड अद्याप प्रत्यक्ष सेवेत आलेले नाहीत. सन २०१९ मध्ये एमआरव्हीसीद्वारे या कारशेडचा समावेश करण्यात आला. मात्र, भूसंपादन, मंजुरी आणि निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे प्रत्यक्ष बांधकामाला मोठा उशीर झाला. भिवपुरीतील प्रमुख नागरी कामाचे कंत्राट मंजुरीनंतर तब्बल सहा वर्षांनी ऑगस्ट २०२५ मध्ये देण्यात आले. तब्बल एक वर्षे पूर्ण होऊनही भिवपुरीत अद्याप पायाभूत कामे सुरू आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी)द्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ए (एमयूटीपी-३ए) अंतर्गत या दोन्ही कारशेडसाठी सुमारे २,३५३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नव्या उपनगरीय मार्गिका आणि भविष्यातील वातानुकूलित लोकलच्या देखभालीसाठी ही सुविधा महत्त्वाची मानली जाते. मात्र, प्रकल्प मंजूर झाल्यापासून बराच काळ प्रशासकीय प्रक्रियेत अडकला होता. तर, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतरही कारशेड पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.

सहा वर्षांनी भिवपुरीत प्रत्यक्ष काम

भिवपुरी कारशेडसाठी आवश्यक ४५.२४ हेक्टर जमीन संपादित आहे. त्यात ४२.२८ हेक्टर खासगी आणि २.९६ हेक्टर सरकारी जमीन आहे. मात्र, जमीन उपलब्ध झाल्यानंतरही प्रमुख नागरी कामांचे कंत्राट देण्यासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या कंत्राटात जमीन विकास, माती भरणे व दाबणे, पूल विस्तार, संरक्षक भिंत, जलनिस्सारण आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.

एमआरव्हीसी प्रशासनाद्वारे सांगण्यात आले की, कंत्राटानंतर कामाला गती मिळाली. परंतु, सध्या कारशेडची मुख्य देखभाल सुविधा, तपासणी शेड, वॉशिंग लाइन, स्थिरीकरण मार्गिका आदी पायाभूत सुविधा देखील पूर्ण झालेल्या नाहीत. आतापर्यंत सुमारे ७.१६ लाख घनमीटर मातीचे काम पूर्ण झाले असून संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. पूलांच्या आराखड्यांना आणि कारशेडच्या इंजिनीअरिंग स्केल प्लॅनला मंजुरीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

वाणगावमध्ये अजूनही मंजुरीच्या फेऱ्या

वाणगाव कारशेडसाठी सुमारे ४३.६८ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी ३.६४ हेक्टर खासगी जमीन असून तिच्या संपादनाची प्रक्रिया पुढे गेली आहे. उर्वरित मोठा भाग वनजमिनीचा आहे. त्यामुळे या कारशेडसमोर भूसंपादनासोबतच वन मंजुरीचे आव्हान आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये वाणगाव प्रकल्पाला पहिल्या टप्प्यातील तत्त्वतः वन मंजुरी मिळाली. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील वन मंजुरीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे सात वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या प्रकल्पातील प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग अजून पूर्णपणे मोकळा झालेला नाही.

लोकल वाढणार, पण देखभालीची तयारी संथ

भिवपुरी कारशेडचा संबंध पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेशी, तर वाणगाव कारशेडचा संबंध विरार-डहाणू चौपदरीकरणाशी जोडला आहे. नव्या मार्गांवर लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन असताना त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक कारशेड मात्र अद्याप उभारणीच्या टप्प्यात आहेत. पनवेल – कर्जत लोकल सेवा वर्ष २०२७ मध्ये प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. परंतु, तोपर्यंत भिवपुरी कारशेड उभे राहण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे पनवेल – कर्जत लोकल रेकच्या देखभाल-दुरूस्तीचा भार इतर कारशेडवर येण्याची शक्यता आहे.

या दोन्ही कारशेडमुळे मध्य रेल्वेवरील विद्यमान कुर्ला, कळवा, सानपाडा आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार कारशेडवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. भिवपुरी येथे भविष्यात १२ डब्यांच्या २० लोकलची स्थिरता व देखभाल करण्यासाठी सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. परंतु, नव्या लोकलसाठी कारशेड आधी तयार होईल अशी अपेक्षा असताना सात वर्षांत प्रकल्प मंजुरी, भूसंपादन, पर्यावरणीय मंजुरी आणि कंत्राटी प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांत अडकला. आता काम सुरू झाले असले तरी कारशेड पूर्ण होऊन प्रत्यक्ष लोकलची देखभाल सुरू होण्यासाठी अजून मोठा टप्पा पार करावा लागणार आहे.

भिवपुरी आणि वाणगाव कारशेडसह विद्यमान देखभाल सुविधांचे बळकटीकरण करून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या भविष्यातील वाढत्या ताफ्याच्या देखभाल-दुरुस्तीची आवश्यकता पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे नियोजन आहे. प्रकल्पातील विविध कामे संबंधित मंजुरी, आराखडे आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार टप्प्याटप्प्याने पुढे नेली जात आहेत, असे एमआरव्हीसी अधिकाऱ्याद्वारे सांगण्यात आले.