लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे, मुंबई : भिवंडीतील नारपोली भागात चारमजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली. राज्यातील सर्व शहरांतील अतिधोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्व महापालिका आयुक्तांना दिले. ठाणे महापालिका आयुक्तांनी तात्काळ शहरातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

नारपोली येथील बालाजीनगर परिसरातील गंगारामवाडी येथे गुरुवारी रात्री कोहिनूर ही धोकादायक इमारत कोसळली. २०१२मध्ये उभारण्यात आलेली ही इमारत गेल्या काही काळापासून धोकादायक झाली होती. त्यातच विनापरवाना दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही इमारत कोसळली आणि १० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या तीन मजुरांचा समावेश असून ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), अग्निशमन दलाचे कर्मचारी, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासूनच बचावकार्य सुरू करण्यात आले. ढिगार्‍यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास पहिला मृतदेह ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत १० मृतदेह ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले.

काही दिवसांपूर्वी मुंबईत मानखुर्द येथे धोकादायक इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळयात धोकादायक इमारती कोसळून अनेक रहिवाशांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. भिवंडी दुर्घटनेतील इमारतीच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

भिवंडीतील इमारत दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रशासनाने वारंवार नोटिसा बजावून किंवा कारवाई करूनही अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी घरे रिकामी करीत नाहीत. मात्र नागरिकांचा जीव महत्त्वाचा असल्याने यापुढे अतिधोकादायक इमारती प्रसंगी सक्तीने रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

सहा वर्षांमध्ये तीन वेळा नोटीस

– या इमारतीला मागील सहा वर्षांमध्ये तीन वेळा नोटीस बजवाल्याची माहिती भिवंडी महापालिका प्रशासनाने दिली. ७ सप्टेंबर २०२० मध्ये प्रथम संरचनात्मक तपासणी अहवाल सादर करण्याची नोटीस देण्यात आली होती.

– त्यानंतरही अहवाल न सादर केल्याने २२ एप्रिल २०२२ मध्ये स्मरणपत्र बजावण्यात आले. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ५ जून रोजी इमारत निर्मनुष्य करण्याची नोटीस देण्यात आली.

– त्यानंतर महापालिकेने इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करून रहिवाशांचे स्थलांतर केले होते, असा दावा महापालिकेने केला.

ठाणे शहरातील अतिधोकादायक इमारती पाडण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे : भिवंडी दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. इमारती रिकाम्या करण्यापूर्वी भाडेकरू आणि सदनिकाधारकांच्या ताब्यातील चटई क्षेत्रफळाची मोजणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्याचेही निर्देश सौरभ राव यांनी दिले. इमारती रिकाम्या करण्यास अडथळा निर्माण झाल्यास संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात यावा. इमारत कोसळण्यापूर्वी दिसणार्‍या धोक्याची माहिती नागरिकांना देण्यासाठी इमारतीवर इशारा फलक लावण्यात यावा, अशी सूचना सौरभ राव यांनी केली.