मुंबई : मतदार याद्यांचे सखोल विशेष पुनरिक्षण प्रक्रियेपूर्वी (एसआयआर) भिवंडीत ३,७६,१३८ मतदार होते. या प्रक्रियेदरम्यान केवळ १,९१,०९७ मतदारांचे (५१%) मॅपींग झाले असून १,८४,७१६ मतदारांची (४९%) नावे वगळली आहेत. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली असून बेकायदा पद्धतीने वगळण्यात आलेली मतदारांची नावे पुनर्स्थापित करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
अर्ज क्रमांक ७ चा गैरवापर करून भाजपचे मतदार नोंदणी प्रतिनिधी (बीएलए) १२ हजार पेक्षा अधिक नावे वगळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम मतदार आहेत. मतदार तिथे राहत असतानाही त्यांना स्थलांतरीत दाखवले आहे. नोंदणी अर्ज सादर केला असूनही हजारो मतादारांची नावे वगळली आहेत. हजारोंचे नोंदणी अर्ज मतदान केंद्रनिहाय नोंदणी अधिकाऱ्यांनी (बीएलओ) गहाळ केले आहेत. ज्यांनी अर्ज क्रमांक ७ (मतदार वेगळणे ) दाखल केले, ते स्थानिक बिएलए नाहीत. एसआयआर प्रक्रियेत मुस्लीम, दलित, आदिवासी मतदारांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा आमदार शेख यांनी केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट २०२३ मध्ये मतदार नोंदणी प्रतिनिधी (बीएलए ) नियुक्त करताना त्याचे नाव त्या भागातील मतदान यादीत असणे अनिवार्य केले हाेते. मात्र नोव्हेंबर २०२५ रोजीच्या बदलानुसार मतदार नोंदणी प्रतिनिधी त्या विधानसभा मतदारसंघातून नियुक्त जात आहे. त्यामुळे मतदारांची नावे वगळण्याच्या संख्येत वाढ झाली असून याचा फटका दलित, मुस्लीम आणि आदिवासी मतदारांना बसतो आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये एसआयआर प्रकियेतील मनमानी विरोधात उत्स्फुर्तपणे सह्यांची मोहीम राबवली गेली असून सह्यांचे निवेदन राज्यपाल महोदय यांना देणार असल्याचे आमदार शेख म्हणाले.
एसआयआर प्रक्रिया केवळ मतचोरी आहे. विशिष्ट विचाराच्या राजकीय पक्षाला निवडणुकीत लाभ पोचवण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रक्रियेत हटवण्यात आलेली नावे पुनर्स्थापित करावीत. ज्यांनी ही प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबवली, त्यांची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई व्हावी, असे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोग पाठवल्याचे आमदार शेख यांनी स्पष्ट केले.
मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे उपमहापौर तारीक मोमीन, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा ईशा इमरान खान,प्रभाग समिती चेअरमन हसनईन फारुकी, तब्बसूम मिर्झा, समिना अन्सारी तसेच नगरसेवक प्रशांत लाड आणि रोहिदास वाघमारे उपस्थित होते.
