मुंबई : नाशिक येथील स्वयंघोषित भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने दखल घेतली आणि खरातसह सहा आरोपींना समन्स बजावून पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले.
नोंदीवरील प्राथमिक पुराव्यांवरून आरोपींनी फसवणुकीच्या गुन्ह्यातून पद्धतशीरपणे पैसे गोळा केल्याचे दिसते. खरातने स्वतःला कृष्णाचा अवतार, धार्मिक व आध्यात्मिक तसेच अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सातत्याने आपल्या जाळ्यात ओढले, असेही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी ईडीच्या आरोपपत्राची दखल घेताना नमूद केले. आरोपींनी गुन्ह्यातून मिळालेली रक्कम कोणताही वाद नसलेली मालमत्ता दाखवून आर्थिक गैरव्यवहार
केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते. त्यामुळे, सर्व आरोपींविरुद्ध दाखल आरोपपत्र त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुरेसे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने खरातसह इतर आरोपींना समन्स बजावताना नोंदविले.
ईडीच्या आरोपानुसार, खरात हा ४७.७४ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार असून, त्याने भाविकांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला व ६० बेनामी बँक खाती उघडली. त्यानंतर, २०२१ ते २०२६ दरम्यान या खात्यांतून मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करण्यात आले. यापैकी ४३ खाती मे २०२१ मध्ये एकाच दिवशी उघडण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. खरातने पद्धतशीर खंडणी आणि भक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळून पैसा कमावला. त्यानंतर, बेनामी बँक खाती, सहकारी पतसंस्था आणि कुटुंबातील सदस्यांच्या खात्यांच्या एका अत्याधुनिक जाळ्याद्वारे हा पैसा हस्तांतरित केला.
प्रकरण काय ?
एका विवाहित महिलेने तीन वर्षांच्या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर, खरातला नाशिक पोलिसांनी १८ मार्चला प्रथम अटक केली होती. त्यानंतर, त्याच्याविरोधात आणखी तक्रारी समोर आल्या. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये खरातविरुद्ध दाखल झालेल्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या डझनभर प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते.
