मुंबई लगतच्या वसई-विरार परिसरातील भुईगाव हे निसर्गसंपन्न गाव म्हणून ओळखले जाते. समुद्रकिनारा, खाडी, कांदळवन आणि शेतीमुळे येथे पक्ष्यांना पोषक अधिवास मिळतो. विविध स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदींमुळे भुईगाव पक्षी निरीक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे.

मुंबईला खेटून असणारा वसई-विरार प्रदेश हा मुळातच निसर्गसंपन्न भाग म्हणून ओळखला जातो. मागील काही वर्षांत या शहरातील हिरव्या वाटा कमी झाल्या असल्या, तरी आजही काही भागांत निसर्गाने बहरलेल्या, नारळी-पोफळीच्या बागांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या शेती-वाड्या आपले लक्ष वेधून घेतात. यातीलच एक प्रसिद्ध गाव म्हणजे ‘भुईगाव’. समुद्राच्या जवळ वसलेले हे गाव शेतीसाठी आणि येथे पिकणाऱ्या भाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. याचबरोबर आणखी एका गोष्टीसाठी या गावाला विशेष महत्त्व आहे आणि ती म्हणजे परिसरात असणारा समृद्ध पक्षी अधिवास.

समुद्रकिनारा आणि त्याच्या आजूबाजूचा खाडीचा भाग, त्यालगतचे कांदळवन, तसेच शेतीचा आणि लहान-मोठ्या झाडाझुडपांचा भाग यामुळे या परिसरात अनेक स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्षीही मोठ्या प्रमाणावर आढळतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे स्थलांतरित पक्षी एरवी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात असतात. मात्र, त्यांच्या स्थलांतराच्या कालावधीत, खासकरून हिवाळ्यात, हे पक्षी अगदी आपल्या जवळच्या परिसरात सहज दृष्टीस पडतात. भुईगावला भेट देणाºया पक्ष्यांमध्ये मध्य आणि उत्तर आशिया, युरोप, रशिया यांच्याबरोबरच तिबेट आणि हिमालयाच्या उत्तर भागाकडून येणाºया पक्ष्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत भुईगाव समुद्रकिनाºयावर २३८ हून अधिक पक्षी प्रजाती नोंदल्या गेल्या असून, यात युरेशियन रायनेक, युरेशियन हॉबी, ब्राउन-हेडेड गल, पेरेग्रिन फाल्कन, ओरिएंटल स्कायलार्क आणि व्हिस्कर्ड टर्न या पक्ष्यांसह इतर अनेक पक्ष्यांचा समावेश आहे.

याचबरोबर ग्रे प्लोव्हर, गोल्डन प्लोव्हर, ब्रॉड-बिल्ड सँडपायपर, कल्र्यू सँडपायपर, डनलिन, ग्रीन सँडपायपर, युरेशियन व्हिम्ब्रेल आणि युरेशियन कल्र्यू हे स्थलांतरित पक्षी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने आढळतात. याशिवाय लाँग-टेल्ड श्राइक, पाइड बुशचॅट, र्लांफग डव्ह, वेस्टर्न मार्श हॅरियर, ओरिएंटल हनी-बझर्ड, स्पॉटेड आउलेट, ब्राह्मणी काइट, इंडियन सिल्व्हरबिल, रोझी स्टार्लिंग, अमूर फाल्कन, युरेशियन केस्ट्रेल आणि ग्रीनिश वॉर्बलर आदी पक्ष्यांसह अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी या परिसरात आढळतात. तसेच, मुसळधार पावसाच्या काळात वादळी वाºयामुळे काही दुर्मीळ समुद्री पक्षीही या किनाºयाच्या परिसरात आश्रयाला येतात.

छायाचित्रे : रमेश शेणाई

पर्यटनामुळे ध्वनिप्रदूषण वाढले

मागील काही वर्षांपासून भुईगाव समुद्रकिनाºयावर पर्यटन वाढले आहे. समुद्रावर थेट आपली वाहने घेऊन जाणाºयांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अर्थातच ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. एखाद्याा परिसरात गजबजाट वाढला की पक्षी तेथून जवळच्या दुसºया अधिवासात जातात. किनाºयावर वाढणाºया ध्वनिप्रदूषणामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत येथे येणाºया पक्ष्यांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे, असे पक्षी निरीक्षकांनी सांगितले. तसेच, सतत किनाऱ्यावर वाहने चालविल्यामुळे वाळू दबली जाते आणि त्यामुळे पक्ष्यांना तेथे खाद्या शोधण्यास अडचणी येतात. त्यासाठी वाहनतळ किनाऱ्यापासून काहीसा दूर असणे गरजेचे आहे, असे काही पक्षी निरीक्षकांचे मत आहे. आपल्या परिसरात असणारे पक्षी अधिवास टिकवण्यासाठी त्या भागात काही छोटे-मोठे निर्बंध घातले गेले, तर संवर्धनाच्या दृष्टीने त्याचा हातभार लागतो. सध्या पक्षी निरीक्षण वाढले आहे. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी विदा (डेटा) सहज उपलब्ध होते. तसेच, पक्ष्यांविषयीची जनजागृतीही वाढत असल्याने अनेक युवक आपल्या परिसरात पुढाकार घेताना दिसत आहेत. वसई-विरारमधील विकासाचा वेग पाहता भुईगावसारखे काही समृद्ध भाग टिकवून ठेवणे गरजेचे आहे. या पक्षी अधिवासाला भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकात उतरून भुईगाव येथे जाणाऱ्या बस किंवा रिक्षाने जाता येईल.

पक्ष्यांसाठी महत्त्वाचे तीन अधिवास

भुईगाव परिसरात पक्षी निरीक्षकांमध्ये प्रसिद्ध असणारे भुईगाव बीच, भुईगाव व्हिलेज आणि बर्मापाडा असे तीन प्रमुख पक्षी अधिवास आहेत. समुद्रकिनारा, खाडी, कांदळवन, शेती आणि झाडाझुडपांमुळे या तिन्ही ठिकाणी पक्ष्यांचे वैविध्य दिसते. भुईगाव बीच येथे २३८ हून अधिक, भुईगाव गावात २०४, तर बर्मापाडा येथे १७४ पक्षी प्रजातींच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे एकाच भेटीत विविध परिसंस्था अनुभवता येतात. — siddharth.mhatre@expressindia.com