मुंबई : भुलेश्वरमध्ये २२ ऑगस्टला गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीत २२ फूट मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भुलेश्वरचा राजा मंडळाने यंदा उंच गणेशमूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा मंडळात केवळ लहान पूजेची मूर्ती स्थापन करण्यात येणार असून, ही मूर्ती ११ दिवस ठेवण्यात येणार आहे. तसेच मूर्तीचे आगमन व विसर्जन साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
भुलेश्वरचा राजा मंडळाचे यंदाचे ६३ वे वर्ष आहे. दरवर्षी या मंडळाकडून २० ते २३ फूट उंचीची गणेशमूर्ती साकारण्यात येत होती. यंदाही २२ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तयार करण्यात आली होती. मात्र २२ ऑगस्ट रोजी मूर्तीच्या आगमनावेळी झालेल्या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (३३) व पदाधिकारी ब्रिजेश जोशी (३०) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते.या घटनेनंतर मंडळाने यंदा उंच मूर्तीऐवजी केवळ पूजेची छोटी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली.
११ दिवस पूजेची मूर्ती
मंडळाच्या बैठकीत सुरुवातीला दीड दिवसांसाठी मूर्ती बसवण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, चर्चेनंतर ११ दिवस गणेशमूर्तीची स्थापना करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवात कोणताही मोठा आगमन सोहळा वा मिरवणूक काढली जाणार नाही. अत्यंत साध्या पद्धतीने मूर्ती मंडपात आणली जाईल व त्याच पद्धतीने विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुनील लोणारे यांनी दिली.
भुलेश्वर, खेतवाडी व गिरगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उंच मूर्तींची परंपरा आहे. त्यामुळे भुलेश्वरच्या राजाची २० ते २३ फूट उंचीची मूर्ती हे या परिसरातील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण मानले जात होते. मात्र, यंदा मूर्तीच्या आगमनावेळीच झालेल्या दुर्घटनेने या परंपरेत खंड पडणार आहे. दरम्यान, उंच पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा मुद्दाही काही दिवसांपासून न्यायालयीन चर्चेत होता.
यंदाच्या वर्षासाठी सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतांमधील विसर्जनाबाबतचा पेच काही प्रमाणात सुटला असला, तरी भुलेश्वरमधील दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच वेळी यंदाच्या बैठकीत मुख्यत्वे गणेशमूर्तीची स्थापना व उत्सवाचे स्वरूप याबाबतच चर्चा करण्यात आली. पुढील वर्षी पुन्हा मोठी मूर्ती बसवायची की नाही, तसेच उत्सवाचे स्वरूप काय असावे, याबाबतचा निर्णय नंतर स्वतंत्र बैठकीत घेतला जाणार असल्याचेही लोणारे यांनी सांगितले.
