मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

विधानसभेच्या निवडणुका जवळ असलेल्या सर्व राज्यांमध्ये आतापासून तयारी सुरू केली आहे. भूपेंद्र यादव आणि वैष्णव या दोघांकडे राज्याची जबाबदारी सोपिवण्यात आली आहे. यापैकी भूपेंद्र यादव हे संघटनात्मक बाबींमध्ये माहिर समजले जातात. भाजपच्या निवडणुकीच्या रणनीतीत त्यांचा नेहमीच सहभाग असतो. यापूर्वी २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. तेव्हा राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. या वेळीही यादव यांच्याकडेच राज्याची पुन्हा जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>अजित पवार गटातील आमदारांची ‘घरवापसी’; शरद पवार गटाचे रोहित पवार यांचा दावा

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फक्त नऊ जागा मिळाल्या. गेल्या वेळी जिंकलेल्या २३ वरून संख्याबळ १४ ने घटले आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर जागावाटप करणे ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. महाराष्ट्राची सत्ता कायम राखणे हे भाजपसाठी मोठे आव्हान आहे. या दृष्टीने भूपेंद्र यादव यांना नियोजन करावे लागणार आहे.

महाराष्ट्राबरोबरच निवडणूक होत असलेल्या हरयाणामध्ये भाजपने प्रभारी म्हणनू केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तर सहप्रभारी म्हणून त्रिपूराचे माजी मुख्यमंत्री विप्लबकुमार देव यांची नियुक्ती केली आहे. झारखंडसाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान प्रभारी तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे.