कंत्राटी नियुक्त्यांसाठी नवीन कार्यपद्धती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देण्यासाठी नवीन कार्यपद्धतीस आणि मानधनात मोठी वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयात चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदे रिक्त आहेत. या विषयातील डॉक्टरांना खासगी व्यवसाय करण्यास प्राधान्य देतात. सध्याच्या कार्यपध्दतीनुसार केवळ सेवानिवृत्त अध्यापकांनाच अधिष्ठात्यांमार्फत वयाच्या ६५ वर्षांपर्यंत कंत्राटी नियुक्ती देता येते. अशा कंत्राटी सहयोगी प्राध्यापकांना व प्राध्यापकांना अनुक्रमे दरमहा ४० हजार रुपये व ५० हजार रुपये इतके मानधन मिळते. या अल्प मानधनामुळे आवश्यक संख्येने अध्यापक उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे या पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देण्याच्या सुधारित कार्यपध्दतीस मान्यता देण्यात आली.

आवश्यक पात्रता असलेल्या व सेवानिवृत्त नसलेल्या डॉक्टरांनाही कंत्राटी नियुक्ती देण्यात येईल. ही नियुक्ती वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून उमेदवारांच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत करता येईल.

सेवा निवृत्त नसलेल्या प्राध्यापकांना क्षेत्र किंवा विभागनिहाय व विषयनिहाय पुढीलप्रमाणे मानधन दिले जाईल. उर्वरित महाराष्ट्रातील प्राध्यापकांना १ लाख ८५ हजार रुपये, तर अन्य भागांत दोन लाख रुपये, अतिविशेषोपचारासाठी दोन लाख ३० हजार रुपये मानधन दिले जाईल. सहयोगी प्राध्यापकांनाही एक लाख ७० हजार रुपये ते दोन लाख १० हजार रुपये मानधन विभागानुसार दिले जाईल.  सुधारित कार्यपध्दतीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील रिक्त असलेली पदे भरण्यास  मदत होईल. अधिक संख्येने विशेषज्ञ डॉक्टर्स निर्माण होण्यास चालना मिळणार आहे, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे स्थापन झालेल्या अतिविशेषीकृत रुग्णालयातील ८ विषयांमध्ये प्रत्येकी ४८ याप्रमाणे ४ संस्थांमध्ये मिळून दरवर्षी एकूण १९२ पदव्युत्तर पदवी विद्यार्थी पदे व पर्यायाने अतिविशेषीकृत डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big increase in honorarium for medical college professors new procedures for contract appointments akp
First published on: 28-01-2022 at 01:06 IST