scorecardresearch

ओटीटी व्यासपीठावरून मोठी भरारी

‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

ओटीटी व्यासपीठावरून मोठी भरारी

प्रत्येक कलाकृतीतून सतत नावीन्य आणि वेगळेपण देण्याचा हिरिरीने प्रयत्न करणारा चोखंदळ अभिनेता म्हणून चित्रपट-नाटय़ अभिनेता जितेंद्र जोशीची ओळख सर्व प्रेक्षकांना आहे. २०१८च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले.  गेल्या तीन वर्षांत जितेंद्रने चित्रपट तसेच ओटीटी माध्यमावरही आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. जितेंद्रने ओटीटी (ऑव्हर द टॉप) या व्यासपीठातूनही मोठी भरारी घेतली असून त्याची भूमिका असलेल्या ‘नेटफिल्क्स’वरील ‘बेताल’ (२०२०) आणि ‘अल्ट बालाजी’वरील ‘कार्टेल’ (२०२१) अशा मोठय़ा वेबमालिका प्रदर्शित झाल्या. १८ मार्चला त्याची ‘झी ५’वरील ‘ब्लडी ब्रदर्स’ ही नवी वेबमालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच त्याचा अनिल कपूरसोबतचा ‘नेटफिल्क्स’वरील ‘थार’ हा थरारपटही प्रदर्शित होईल. जितेंद्रचा ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो आपली निर्मिती असलेल्या ‘रावसाहेब’ या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. – जितेंद्र जोशी लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१८

अनोखी अन्नपूर्णा

अम्रिता हाजरा या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ (आयआयएसईआर) या संस्थेत संशोधक आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. वनस्पती आणि सूक्ष्म जीव आहारातील जीवनसत्त्वांचे एकत्रीकरण आणि संश्लेषण करण्यास समर्थ असतात; पण आपल्याला बाह्य स्रोतांद्वारे जीवनसत्त्वांची गरज पूर्ण करावी लागते. याच गोष्टीचा वापर जीवनसत्त्वांचे व्यापारी तत्त्वावर एकत्रीकरण करण्यासाठी होऊ शकतो, हा विचार अम्रिताच्या संशोधनाची प्रेरणा आहे. सध्या जीवनसत्त्व ब १२ आणि जैवसंश्लेषण संदर्भात त्यांचे तीन वेगवेगळय़ा पातळय़ांवर संशोधन प्रकल्प सुरू आहेत. पोषक, समृद्ध अशा बाजरीवर्गीय धान्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. कमी पाण्यात तग धरणारी, जैवविविधता जपणारी ही रोपे आणि त्यांचे मानवी आहारातील महत्त्व यांचा सखोल अभ्यास अम्रिताने तिच्या संशोधनात केला आहे. परदेशातून २०१६ साली भारतात परत आल्यावर अम्रिताने अनेक शाळा- महाविद्यालयांत या धान्यांचे महत्त्व पटवून देऊन जनजागृतीचे कार्य हाती घेतले. अम्रिताने आजवर अनेक चर्चासत्रांत

भाग घेऊन आपले संशोधन जगासमोर मांडले आहे. सध्या अम्रिता या पाच पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत  आहेत.   –अम्रिता हाजरा  लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१७

कामगिरीचा चढता आलेख

भारताचा २७ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू विदित गुजराथीला २०१८च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्याची कामगिरी अधिकच उंचावत गेल्याचे पाहायला मिळाले. २०१९ मध्येच विदित स्वित्र्झलड येथे होणाऱ्या बिल स्पर्धेचा विजेता ठरला. मग २०२० मध्ये विदितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑनलाइन स्वरूपात झालेल्या ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे रशियासह संयुक्तरीत्या जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. २०२१ मध्ये भारताने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आणि विदित या वेळीही संघाचा भाग होता. गेल्या वर्षीच जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात विदितने भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केली. कामगिरीच्या या चढत्या आलेखामुळेच माजी कनिष्ठ जगज्जेत्या विदितची आता भारताच्या सर्वोत्तम पुरुष बुद्धिबळपटूंमध्ये गणना केली जाते.

  • विदित गुजराथी लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१८

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक

विकास महामंडळ (एमआयडीसी) 

  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह

बँक लि., महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पॉवर्ड बाय :  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big jump from the ott platform loksatta tarun tejankit akp

ताज्या बातम्या