मालाड पश्चिम येथे डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. डंपर चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले असून याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी अनोळखी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसी टीव्हीवरील चित्रीकरणाच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

महेश पटेल या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पटेल हे मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉल जंक्शन येथील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते शुक्रवारी कामावर हजर झाले असता एका डंपर चालकाला दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर आरोपीने जखमी दुचाकीस्वाराला कोणतेही उपचार न देता तेथून पलायन केले. पटेलने तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरूणाला कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मृत तरूणाची ओळख सुधीरकुमार चौधरी अशी आहे. तो मालाड येथील मालवणी परिसरातील रहिवासी आहे. भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात केल्यानंतर जखमी दुचाकीस्वाराला कोणतीही मदत न देता पलायन करणाऱ्या डंपर चालकाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने आरोपीची माहिती घेतली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.