मुंबई : प्रशासनाने घन कचरा विभागात कंत्राटदारांकडून सेवा घेण्याचे ठरवलेले असताना त्याविरोधात कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने घन कचरा विभागातील कामगारांना नियमितपणे फेस रिडिंग संयंत्राच्या माध्यमातून हजेरी नोंदवणे बंधनकारक केले आहे. परिणामी, मुंबई महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागातील कामगार आणि प्रशासन यांच्यात येत्या काळात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
संपूर्ण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरीता कंत्राटदारांकडून वाहने आणि सेवा घेण्याच्या निर्णयावर मुंबई महापालिका प्रशासन ठाम असून या कामासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. सात वर्षांसाठी ही सेवा घेतली जाणार असून त्याकरीता सुमारे ४,१६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिका प्रशासनाचे हे धोरण म्हणजे खासगीकरण असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे पालिका प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
घन कचरा व्यवस्थापनासंदर्भात पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी के – पूर्व विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत नुकताच आढावा घेतला. त्यावेळी घन कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमितपणे फेस रिडिंग संयंत्राच्या माध्यमातून उपस्थितीची नोंद व्हायला हवी, असे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले.
मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक मार्ग, गल्लीबोळ स्वच्छ करायला हवे. रस्त्यावरील कचरा रोजच्या रोज उचलणे अपेक्षित आहे. यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) कॉम्पॅक्ट वाहनांचा वापर करावा. तसेच, सहायक मुख्य पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारी ठिकाणे, तेथील स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवून नियोजनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, असे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले.
घन कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमितपणे फेस रिडिंग संयंत्राच्या माध्यमातून उपस्थितीची नोंद व्हायला हवी. सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी परिसर स्वच्छतेचा दैनंदिन आढावा घ्यावा. त्यासोबतच प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून आपापल्या अधिकारक्षेत्रातील परिसरात नियमितपणे परीक्षण करावे, अशा सूचनाही डॉ. जोशी यांनी यावेळी दिल्या.