मुंबई : ब्रिटनचे पश्चिम भारतासाठीचे उपउच्चायुक्त आणि दक्षिण आशियाचे व्यापार आयुक्त अॅलन गेमेल यांनी बुधवारी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘किंग्स बर्थडे पार्टी’चे आयोजन वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये केले होते. या मेजवानीला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.
मुंबईत झालेल्या या सोहळय़ाला महाराष्ट्र सरकारचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, दूतावासांतील अधिकारी-व्यापार प्रतिनिधी, उद्यम जगतातील मान्यवर आणि कला, चित्रपट, शिक्षण, संशोधन तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अभिनेत्री तारा शर्मा सलुजा, मंजरी फडणीस, कुणाल विजयकर, सुशांत दिवगीकर, प्रसिद्ध बॉलीवूड छायाचित्रकार मानव मंगलानी, आशय निर्माते कामिया जानी यांसह काही लोकप्रिय असामी या शाही सोहळय़ाला हजर होत्या. पिरामल, रिलायन्स, व्हर्जिन, एचएसबीसी, डियागिओ आणि अन्यांनी प्रायोजित केलेल्या या सोहळय़ात ब्रिटिश खाद्य आणि पेय, संस्कृती, क्रीडा आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवण्यात आले.
यावेळी ब्रिटनचे पश्चिम भारतासाठीचे उपउच्चायुक्त अॅलन गेमेल म्हणाले, ब्रिटन आणि भारत यांच्यात चांगली मैत्री आहे आणि आज आम्ही राजे चार्ल्स तिसरे यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सौहार्दपूर्ण नात्याचा उत्सव साजरा करीत आहोत. मी भारतात सहा वर्षे राहत असून या विस्मयकारक देशाचा प्रवास केला आहे. येथील संस्कृती, क्रीडा, चित्रपट, व्यापार, गुंतवणूक, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांत ब्रिटन आणि भारताचे विशेष संबंध आहेत. ते आता अधिक दृढ होत आहेत.