मुंबई : मुंबई अग्निशमन दलामध्ये ६८ मीटर उंचीच्या शिडी वाहनासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, मात्र ही निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे. एका विशिष्ट कंपनीला फायदा होईल अशाच पद्धतीने ही निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. अग्निशमन दलात आधीच ६४ मीटर उंचीचे शिडी वाहन आहे, असे असताना आता केवळ चार मीटर अधिक उंचीच्या शिडी वाहनांच्या खरेदीसाठी ४० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबईमध्ये उंच इमारतींची संख्या मोठी आहे. या इमारतीत आग लागल्यास बचावकार्यासाठी उंच शिडीचा वापर करण्यात येतो. मुंबई अग्निशमन दलात ६४ मीटर उंच शिडी वाहने आहेत. जानेवारी महिन्यामध्ये अग्निशमन दलाने ६८ मीटर उंचीची चार शिडी वाहने खरेदी करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया आता वादात सापडली आहे. भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी याप्रकरणी आरोप केले असून त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना पत्र पाठवले आहे.
अवघ्या चार मीटरसाठी दुप्पट पैसे!
● ६८ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ‘टर्न टेबल लॅडर’साठी (शिडी) २०१७-१८ मध्ये तीन वेळा निविदा काढण्यात आली होती. प्रत्येक वेळी मॅग्रियस जीएमबीएच हा एकच बोलीदार होता. म्हणून पालिकेने ६४ मीटर शिडी बनवणाऱ्या कंपनींना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली. यावेळी झालेल्या स्पर्धात्मक प्रक्रियेत १० कोटी रुपयांत ६४ मीटर शिडी खरेदी करण्यात आली. ● अग्निशमन दलाने थेट ६८ मीटर उंच शिडीसाठी निविदा मागवल्या. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत अन्य कोणत्याच कंपनीला भाग घेता आला नाही. त्यामुळे ६८ मीटर शिडी बनवणाऱ्या कंपनीची मक्तेदारी वाढली. या शिडीची किंमत थेट २० कोटी रुपयांवर नेऊन ठेवली. ● अवघ्या चार मीटरने शिडीची उंची वाढत असताना महापालिका ६४ मीटर शिडीपेक्षा दुप्पट पैसे मोजणार आहे. त्यामुळे चार शिड्यांसाठी ४० कोटी अधिकचे दिले जाणार असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे.
खरेदी अद्याप नाही
अग्निशमन दलाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. उंच इमारतींसाठी ६८ मीटरच्या शिड्यांची गरज आहे. मात्र किंमत जास्त असल्यामुळे अजून कार्यादेश दिलेले नाहीत. जुन्या शिड्या कमी उंचीच्या आहेत. त्या ३७ मीटर, ४२ मीटर उंच आहेत. तसेच ६८ मीटर उंच शिडी वेगाने वर जाणारी आहे. तंत्रज्ञान हे नेहमी महागच असते. अद्यायावत तंत्रज्ञानामुळे मुंबई अग्निशमन दलाची ख्याती आहे. या गाड्या बचावकार्यासाठी आवश्यक आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चौकशीची मागणी
● शिरसाट यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई अग्निशमन दलात ६४ मीटर उंचीचे शिडी वाहन (टर्न टेबल लॅडर) उपलब्ध आहे. त्याशिवाय आपत्कालीन काळामध्ये उंच इमारतीत पोहोचण्यासाठी ७० मीटर, ८१ मीटर आणि ९० मीटर उंच ‘हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म’ बसवलेली वाहने आहेत. तरीही पालिकेच्या अग्निशमन दलाने ६८ मीटर उंचीच्या चार शिड्या खरेदी करण्यासाठी कंत्राट प्रक्रिया राबविली आहे. ● ६८ मीटर उंचीची शिडी बनवणारी जगभरात मॅग्रियस जीएमबीएच ही एकमेव कंपनी आहे. याच कंपनीची जगभरात मक्तेदारी आहे. त्यामुळे शिडी खरेदीमध्ये स्पर्धाच झाली नाही, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर असून या खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी शिरसाट यांनी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली आहे.