scorecardresearch

भाजप-शिवसेनेकडून पालिका स्वबळावर?

महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी भाजप आणि शिवसेनेने सुरू केली आहे.

Sena bjp alliance breaked for pmc

आगामी मुंबई आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी भाजप आणि शिवसेनेने सुरू केली आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असून भाजपकडूनही राजकीय व्यूहरचना केली जात आहे. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असून दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढत चालला आहे.
शिवसेनेची ताकद असलेली मुंबई महापालिका खेचून घेण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यादृष्टीने पावले टाकत आहेत. मेट्रो प्रकल्प, सागरी किनारपट्टी रस्ता यासह मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प, अतिक्रमणे नियमित करणे, झोपडपट्टीवासीयांना घरे, धारावी पुनर्वसन प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आदींचे श्रेय भाजपला मिळावे, असे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी नुकतीच मुंबईतील आमदार-खासदारांची बैठक झाली. मुंबईतील प्रलंबित प्रकल्प, केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले विविध प्रश्न कसे सोडविता येतील आणि त्याचा लाभ भाजपला कसा मिळेल, कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे, याबाबत विचारविनिमय झाला.
तर शिवसेनेनेही विधानसभेची निवडणूक लढविलेले उमेदवार, विभागप्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने सुरू करण्याच्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-04-2016 at 05:30 IST