उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ‘महाविजय’ संपादन करण्यासाठी भाजपने पक्षातील वयोवृद्धांना साद घातली आहे. जनसंघापासूनच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचार यंत्रणेत सामील करून घेण्यात येणार असून त्यासाठी ‘स्व. नानासाहेब तथा उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान’ सुरू करण्यात आले आहे.

भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्र (बूथ) आणि मतदारयादी निहाय (पन्ना प्रमुख) कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज लागणार आहेत. हे लक्षात घेऊन भाजपने जुन्या, जाणत्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फौज बांधण्यास सुरुवात केली आहे. अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या कार्यकाळात आमूलाग्र बदलला. सर्व राजकीय पक्षांमधून कार्यकर्ते पक्षात आले. त्यांना गरजेनुसार सत्तापदे, पक्षातील पदे दिली गेली. या बदलामुळे भाजपचा जुना कार्यकर्ता पक्षापासून मनाने दुरावत गेला. आमच्या त्याग व कामाच्या बळावर पक्ष उभा राहिला तरी अन्य पक्षातून आलेल्या नेते व कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जाते, ही नाराजीची भावना जनसंघापासून किंवा गेली अनेक वर्षे पक्ष कार्यात झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढीस लागली.

अभियानाचे स्वरूप..

पक्षाला जुन्या विश्वासू, निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री, पहिले प्रदेशाध्यक्ष नानासाहेब ऊर्फ उत्तमराव पाटील यांच्या नावाने अमृत अभियान सुरू करण्यात आले आहे. वयाची साठी पूर्ण केलेल्यांपासून ऐंशीच्या घरात असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या अभियानात सामावून घेतले जाणार आहे. प्रत्येक गावातून किमान एक अशी तालुका व जिल्हा पातळीवर रचना राज्यभरात केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा करून या मोहिमेचे नियोजन केले असून राज्य संयोजकपदी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि म्हाडा घरदुरुस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रवक्ते मधू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp amrit kumbh abhiyan for maha vijaya including senior activists from jana sangh ysh
First published on: 20-03-2023 at 00:27 IST