राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावरुन भाजपा युवा मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईमधील प्रदेश कार्यालयावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना थोड्या दूरवरच रोखले. पोलिसांनी रोखल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा नष्ट करुन तो जाळू दिला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपाचा निषेध केला.

विधानपरिषदेचा पराभव लपविण्यासाठी भाजपाचे आंदोलन

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई युवती संघटक अदिती नलावडे यांनी भाजपाच्या आंदोलनावर टीका केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ येऊन दाखवावे, त्यांचे आम्ही स्वागत करु, असे आव्हान त्यांनी दिले. “विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. त्याच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत उत्तर दिलेले आहे, त्यामुळे हा विषय तिथेच संपतो. तरिही भाजपाला आंदोलन करायचे असेल तर त्यांनी इथे येऊनच दाखवावे.”, अशी भूमिका अदिती नलावडे यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर भाजपने जोरदार टीका केली होती. आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्त आव्हाड यांनी एक खोचक ट्वीट केलं होतं. त्यांच्या नव्या ट्विटवर देखील भाजपाकडून जोरदार विरोध करण्यात आला. ‘रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.’ त्यांच्या या ट्वीटवर शिंदे गटासह भाजपनं जोरदार हल्लाबोल केला. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के तर म्हणाले की, आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांची जीभ कापणाऱ्याला दहा लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.

राज्यपालांनी अवमान केला तेव्हा कुठे होता?

राष्ट्रवादीकडून भाजपाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना भाजपाच्या जुन्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. भाजपाच्या इतर नेत्यांनी महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये केली, तेव्हा भाजपाचे नेते मूग गिळून गप्प होते. त्यावेळी तुम्ही आंदोलन का नाही केले? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तसेच भाजपाचे कार्यकर्ते इथे पोहोचायला असमर्थ ठरत असतील तर आम्हीच तिथे जाऊन त्यांचा समाचार घेतो, असे प्रतिआव्हान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले.