भाजप-राष्ट्रवादीचा उद्धव यांना टोला
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपने लूटमार करण्याशिवाय काहीही केले नसल्यामुळे मुंबईकर या वेळी पालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे विसर्जन करतील. त्यामुळे झेंडा फडकविण्याच्या दोघांच्या वल्गनांना काहीही अर्थ नसल्याचे सांगून ज्या शिवसेनेला गेल्या तीन वर्षांत बाळासाहेब ठाकरे यांचे साधे स्मारक उभारता आले नाही त्यांनी तर झेंडा फडकविण्याची गोष्टही करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी लगावला आहे, तर उद्धव यांच्या झेंडा फडकविण्याच्या घोषणाला आम्ही काहीही महत्त्व देत नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असे जाहीर करून शिवसेनेला आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली व बिहारमध्ये तुमची फडफड झाली. आता मुंबईत फडफडू नका, असा टोला लगावत महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा कायम राहणार असा प्रतिहल्ला केला होता. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसही आता मैदानात उतरली आहे. सत्तेवर असूनही ज्यांना गेल्या तीन वर्षांत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागाही घेता आली नाही की स्मारक उभारता आले नाही, ते कसला झेंडा फडकवणार, असा सवाल मलिक यांनी केला.
शिवसेना-भाजपने केवळ मुंबईची सत्ता ओरपण्याचे काम केले असून लोकांनाही आता त्यांचा कंटाळा आला असून महापालिका निवडणुकीत लोकच या दोन्ही पक्षांचे विसर्जन केल्याशिवाय राहणार नाहीत, असे मलिक यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना दानवे म्हणाले की, मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार हे वक्तव्य करण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. दिल्ली व बिहारमध्ये लोकांनी त्यांची ताकद दाखवली यात ज्यांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही, त्यांच्या बोलण्याला मी फारसे महत्त्व देत नाही, असा टोला दानवे यांनी उद्धव यांचे नाव न घेता लगावला.