राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महायुतीचे महामेळावे घेणाऱ्या शिवसेना- भाजप आणि रिपाइंमध्ये सत्तेवर येण्यापूर्वीच स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून मतभेदाचे महाभगदाड पडायला सुरुवात झाली आहे. राज्यात महायुती सत्तेत आल्यास विदर्भ राज्य निर्माण करू, अशी घोषणा भाजप प्रदेश अध्यक्षांनी केल्याबरोबर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली़
भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा दिल्यानंतर भाजपच्या कोटय़ातून मिळालेल्या खासदारकीला जागत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठ़वले यांनीही स्वतंत्र विदर्भासाठी दंड थोपटल्यामुळे शिवसेनेला आता आघाडीऐवजी भाजप-रिपाइंविरोधातच शड्डू ठोकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेना महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र विदर्भाच्या आरोळ्या ठोकण्यास भाजपने सुरुवात केली़  त्यातच रामदास आठवले यांनीही भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार चालविण्यासाठी ज्याप्रमाणे ३७० कलम, राम मंदिर आणि समान नागरी कायद्यासारखे विषय गुंडाळून बाजूला ठेवले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्य चालविण्यासाठी स्वतंत्र विदर्भाचा विषय भाजपने बाजूला ठेवावा, अशी विनवणी करण्याची वेळ शिवसेनेच्या वाघावर आली आहे. शिवसेनेने काढलेल्या पत्रकात एकीकडे महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही, असा इशारा देतानाच महायुतीच्या हितासाठी विदर्भाचा विषय बाजूला ठेवण्याचे विनविण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये भाजप व रिपाइंच्या भूमिकेमुळे अस्वस्थता निर्माण झाली असून भाजप-रिपाइंने आगामी काळातही हा मुद्दा निवडणूक प्रचारात लावून धरल्यास काय करायचे, असा सवाल सेनेच्याच वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.