मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संघटन महामंत्री पदावर अजय जामवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामवाल यांनी यापूर्वी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या संघटन महामंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. जामवाल आता महाराष्ट्र भाजपच्या संघटनाची सूत्रे हाती घेतील.
महाराष्ट्र भाजपमध्ये काही काळापासून प्रदेश संघटन महामंत्रीपद रिक्त होते. संघटनात्मक बांधणी, पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये समन्वय आणि आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर जामवाल यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
जामवाल यांनी यापूर्वी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या संघटनात्मक विस्तारात काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांचा अनुभव पक्षासाठी उपयोगी ठरणार आहे. मुंबई हे त्यांचे केंद्र असल्याने प्रदेश पातळीवरील संघटनात्मक कामकाजावर त्यांचा थेट भर राहील. धोंड यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी भाजपच्या प्रदेश सहसंघटन महामंत्रीपदी सतीश धोंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे केंद्र नागपूर असेल. महाराष्ट्राच्या संघटनात्मक रचनेत मुंबईबरोबरच नागपूरला स्वतंत्र महत्त्व देण्यात आले आहे.
धोंड यांना पक्षाच्या संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून त्यांनी पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये काम केले आहे. तसेच भाजपच्या संघटनात्मक विस्ताराबरोबरच जनजाती मोर्चासह पक्षाच्या विविध आघाड्यांवरही काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग विदर्भातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतून प्रदेश संघटनेचे काम पाहणारे जामवाल आणि नागपूर केंद्रातून संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे धोंड अशी विभागणी करण्यात आल्याने महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ हा भाजपचा महत्त्वाचा राजकीय आधार जातो. धोंड यांचे केंद्र नागपूर ठेवण्यात आल्याने या भागातील संघटनात्मक कामावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत.
