आरेमध्ये होणारी मेट्रो कारशेड रद्द करत ती कांजूरमार्गमध्ये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान कांजूरमार्गमधील जागा केंद्राची असल्याचा दावा केद्र सरकारने केला असल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने सामने आलं आहे. त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आशिष शेलार यांना जाहीर आव्हान दिलं आहे. “आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या. आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत,” असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलं आहे.

“मेट्रो कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या ५० हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेस सोबत करताय की काय?,” असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा- “…तर मी आपली जाहीर माफी मागण्यास तयार,” आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना पत्र

पत्रात त्यांनी काय म्हटलं आहे –
“महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड प्रस्तावित केले आणि महाराष्ट्रातील इंच इंच जमीन महाराष्ट्राची अशी भावनिक अस्मितेची ढाल करून जनतेची दिशाभूल केली जातेय. त्याबद्दल स्पष्ट करू इच्छितो की, सदरची जागा महाराष्ट्राची नसून केंद्र सरकारचीच आहे. असा पहिला दावा केंद्र सरकार कडून १९८३ साली करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचेच सरकार होते. म्हणजेच महाराष्ट्रातील मुंबईमधील कांजूरमार्गची जी जागा आपण प्रस्तावित करत आहात ती महाराष्ट्राची नाही असा दावा त्यावेळच्या केंद्रातील काँग्रेसच्या सरकारने केला होता. ज्यांच्यासोबत आज आपण महाराष्ट्र विकास आघाडीत आहात. कांजूरमार्गची जागा महाराष्ट्र सरकारची म्हणजेच महाराष्ट्राची असा दावा १९८३ साली असलेल्या केंद्र सरकारने म्हणजेच काँग्रेसने केलेला नाही. सदर जागा ही महाराष्ट्राचीच आणि त्यावरील अंतिम निर्णय ज्यामुळे ही जागा महाराष्ट्राच्याच नावावर करण्यात यावी हा दावासुद्धा २०१४ साली करण्यात आला. याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस, मा. चंद्रकांतदादा पाटील आणि यांच्या सरकारने हा दावा केला,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

“दुर्दैव महाराष्ट्राचे एवढेच की ही जागा दिल्लीची आहे असे सांगणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही सलगी केली आहे. आणि ज्यांनी ही जागा महाराष्ट्राचीच आहे असा निर्णय दिला त्या भाजपा विरोधात तुम्ही लढता आहात,” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार”

आशिष शेलार यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले असून त्यांची उत्तरं मागितली आहेत. “मुंबईकर जनतेला मेट्रोचा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन द्यावा याच एकमेव हेतूने फडणवीस सरकारने काम केले. त्यापद्धतीचे निर्णय, सुप्रीम कोर्ट, एनजीटी आणि सर्व न्यायालयात पूरक ठरल्यानंतरच घेण्यात आले. दुर्दैवाने आपले सरकार मुंबईकरांवर अन्याय करतेय. दिशाभूल करतेय. केवळ मेट्रो प्रकल्पाला विलंब होऊ नये हीच तळमळ एक मुंबईकर म्हणून काळजात आहे. म्हणून हे प्रश्नांचे आवाहन आम्ही करतोय. जर आपण या आवाहनाला प्रतिसाद देऊन चर्चा झाल्यास त्यात तुमच खरं ठरलं तर मुंबईकरांसाठी मी आपली जाहीर माफी मागण्यास तयार आहे,” असंही ते म्हणाले आहेत.