scorecardresearch

“तुम्ही फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना…”; आशिष शेलारांची राऊतांवर टीका

जन्म होण्याआधी मी कारसेवेला होतो म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं, असेही शेलार म्हणाले

BJP Ashish Shelar criticizes Sanjay Raut

मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यात भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणिशग फुंकले आहे. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांनाच लक्ष्य केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली. यावर शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल,” असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलं आहे. यावरुनच आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे. तिथे संजय राऊत यांनी जाऊन यावे,” असा टोला आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

“हे आंदोलन साधू संतानी, हिंदू समाजाने सुरु केल्याचे अख्ख्या जगाला माहिती आहे. तुमचा जन्मच १९६० नंतरचा आहे आणि हे आंदोलन त्याआधी सुरु झाले. जन्म होण्याआधी मी कारसेवेला होतो म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ही नावं तरी माहिती आहेत का यांना. उगाच श्रेय घेण्याच्या भानडीत ही गडबड करु नका. आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत,” असे आशिष शेलार म्हणाले.

“हनुमान चालिसाचा विषय भाजपाचा नाही आणि पेट्रोलच्या विषयावर भाजपानेच काम केले आहे. भाजपाच्या सरकारने देशात पेट्रोलच्या करात सवलत दिली आहे याची पंतप्रधांनी आठवण करुन दिली मग त्यावेळी पळ का काढता? काँग्रेस त्यावेळी आंदोलन करत होती मग त्यांनी आता स्वतःच्या सरकारला सांगावे की कर कमी करावे. जगामध्ये युद्ध सुरु असतानाही कोणत्याही दबावाला बळी न पडता पंतप्रधानांनी रशियाकडून क्रुड ऑईल घेतले. त्याबद्दल तुम्ही एकतरी वाक्य काढलं का? तुमच्या डोक्यात राजकारणाची घाण आहे ती आधी साफ करा,” असेही आशिष शेलार म्हणाले.

“याची जवाबदारी रामसेवकांनी घेतली आणि लढाई भाजपाने लढली. दुसऱ्याच्या घरात काही झाल्यावर पाय टाकणे याला जवाबदारी घेणे म्हणत नाही. तुमच्या नावावर साधा गुन्हा दाखल नाही. त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत तुमचा आईसक्रीम खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचे समर्थक आहात आणि त्यामुळे याबाबत बोलू नका,” असेही शेलार म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp ashish shelar criticizes sanjay raut abn

ताज्या बातम्या