scorecardresearch

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा; शेलार म्हणाले “उद्धव ठाकरे यात सहभागी…”

“ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा…”, भाजपा काढणार विराट मोर्चा; पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही

BJP, Ashish Shelar, NCP, Nawab Malik, BJP Morcha,
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा बुधवारी मुंबईत मोर्चा काढणार आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा बुधवारी मुंबईत मोर्चा काढणार आहे. याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यासहित इतर नेत्यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सरकार दाऊदचे समर्थक आहे काय? अशी विचारणा करत घोषणा देण्यात आल्या. आशिष शेलार यांनी यावेळी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे. नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडी दिली असून जामीन मंजूर केलेला नाही याचा अर्थ न्यायालयसुद्धा सक्षमपणे काम करत आहे. तरीही केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा सरकारमध्ये बसलेल घेत नाहीत. दुख: तर उद्धव ठाकरे यात सहभागी आहेत याचं आहे”.

या मोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “भेट झाली असून अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीस न्यायीक पद्धतीने वागतील, राजकीय नाही अशी आमची अपेक्षा आहे. परवानगी न दिल्यास परवानगीशिवाय मोर्चा काढणार”.

“राजीनामा घेतला जात नाही तोवर हे आंदोलन सुरु राहील. जनतेची प्रतिक्रिया सरकारमध्ये बसलेल्या लोकांना विसर्जित करुन टाकेल,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे. या मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp ashish shelar morcha resignation of ncp nawab malik in mumbai mahavikas aghadi cm uddhav thackeray sgy