मुंबई: कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर..; भाजपच्या आशीष शेलार यांचा इशारा | bjp Ashish Shelar warning to Karnataka regarding Karnataka border issue amy 95 | Loksatta

मुंबई: कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर..; भाजपच्या आशीष शेलार यांचा इशारा

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजुंनी तणाव निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण कुणी ‘अरे’ केल्यास आम्ही ‘कारे’ने प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी मांडली.

मुंबई: कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर..; भाजपच्या आशीष शेलार यांचा इशारा
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजुंनी तणाव निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण कुणी ‘अरे’ केल्यास आम्ही ‘कारे’ने प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी मांडली. कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री सातत्याने आक्रमक भूमिका घेत असताना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने एवढय़ा ठोक शब्दांत प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच घटना आहे.

कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला असून मंत्र्यांना बेळगावला पाठवू नका, असे पत्र तिथल्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राला पाठविले आहे. यासंदर्भात प्रश्नांवर बोलताना शेलार म्हणाले, की कर्नाटक सीमाभागातील गावांवर महाराष्ट्राचा अधिकार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात आम्ही स्पष्ट भूमिका मांडली आहे. सीमाभागातील गावांमध्ये शिंदेदे सरकार अनेक योजना पोचविणार आहे. जत भागातील पाणी योजना पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्राचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटककडून कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास भाजप त्याला महाराष्ट्रातून उत्तर देईल. कोणालाही कोठेही जाण्याची परवानगी आहे. महाराष्ट्रातील मंत्री बेळगावला जाणार असतील, तर त्यांना कोणीही थांबवू शकणार नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

मालकांची दादागिरी संपणार
उपकरप्राप्त (सेस) इमारतीतील पुनर्विकासाला वर्षांनुवर्षे खीळ पडली होती. ही समस्या दूर करण्याचे काम शिंदेदे-फडणवीस सरकारने केले आहे. संक्रमण शिबिरांची अवस्था वाईट आहे. आता राहण्याच्या ठिकाणीच सोय होणार असून सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे, असा दावा शेलार यांनी यावेळी केला.

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमत’
राज्यपाल साफ चुकीचे बोलले आहेत. त्याबाबत आम्ही स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही काही पक्ष त्याचे राजकारण करीत आहेत. छत्रपती उदयनराजे हे आमचे राजे आहेत. आंदोलन करण्याचा तसेच आपली भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे, असे शेलार म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 00:22 IST
Next Story
मुंबई:अद्भुत विश्वचषकात आणखी किती धक्के?