मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी गणेशोत्सवाची संधी साधून आपले शक्ती प्रदर्शन, प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे. अनेक गणपती मंडळांच्या मंडपासह बेस्ट बस, बस थांब्यावर ‘आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ अशा मजकुराचे भाजपचे फलक झळकत आहेत, तर शिवसेना आणि शिंदे गटातील अटीतटीही नगरसेवकांनी मंडळांसमोर लावलेल्या स्वागत कमानींवर दिसत आहे. मातोश्रीशीच एकनिष्ठ.. अशी फलकबाजी शिवसेनेचे स्थानिक नेते करत आहेत.

मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत आहे. शिवसेनेच्या पालिकेतील वर्चस्वाला सुरुंग लावण्याची मनीषा बाळगून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर मुंबई महापालिका निवडणुकीची वाढत्या चुरशीचे प्रतिबिंब उत्सवांमध्ये उमटू लागले आहे. नुकत्याच झालेल्या दहीहंडीवेळी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही राजकीय झाला आहे. याचे प्रत्यंतर सध्या मुंबईतील बेस्टच्या गाडय़ा, थांब्यावरील जाहिराती दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती बेस्ट बस, थांब्यांवर झळकल्या आहेत.

करोनाची साथ ओसरल्यामुळे यंदा उत्सवांवरील निर्बंध काढून टाकण्यात आले. त्यामुळे आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले, असे लिहिलेले फलक लावून भाजपने शिवसेनेला डिवचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे या फलकावर आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी मात्र शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. आमची निष्ठा मातोश्रीच, असे फलक कार्यकर्त्यांच्या मंडळात लागले आहेत. एकाच परिसरात वेगवेगळय़ा पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ही फलकबाजी रंगली आहे.