मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. शिंदे गटासोबत असलेला जागा वाटपाचा तिढा काही प्रमाणात सुटल्यानंतर भाजपने नुकतीच उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात प्रस्थापित व नेतेमंडळींच्या आप्तस्वकीयांना उमेदवारी दिल्याने अनेक निष्ठावंतांना धक्का बसला आहे. तसेच, त्यांच्यात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अन्य पक्षातून प्रवेश केलेल्यांनाही पहिल्या यादीत एबी फॉर्म दिल्याने निष्ठावंतांमध्ये खदखद वाढली आहे. महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
तसेच, भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाचे कोडे उलगडत असून भाजपने महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अनेक ठिकाणी माजी नगरसेवकांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. भाजप यावेळी मोठ्या प्रमाणात नवीन चेहरे निवडणुकीत उतरवणार असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी यादीतून ही कुजबुज शांत झाली. यावेळी बहुतांश प्रभागात माजी नगरसेवकांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. अनेक वर्ष सत्तेत असलेले प्रस्थापित, पदाधिकारी, नेतेमंडळींचे आप्तस्वकीय आदींना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे.
या महापालिका निवडणुकीत भाजप नेते राज के. पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित, राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर, किरीट सोमय्य यांचे पुत्र नील सोमय्या, शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर आदी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. मागील निवडणुकीतही या मंडळींना संधी देण्यात आली होती.
मात्र, या निवडणुकीतही निष्ठावंतांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. तसेच, दहिसरमधून जितेंद्र पटेल, चारकोपमधून बाळा तावडे, कांदिवलीतून शिवकुमार झा, दिंडोशीतून प्रतिभा शिंदे, विनोद मिश्रा, मालाडमधून योगिता कोळी, जोगेश्वरीतून प्रीती साटम, उज्वला मोडक, गोरेगावमधून श्रीकला पिल्ले, संदीप पटेल, वर्सोव्यातून रोहन राठोड, वांद्रेतून हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे, मुलुंडमधून प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे, विक्रोळीतून सारिका पवार, भांडुपमधून जागृती पाटील, चेंबूरमधून आशा मराठे, महादेव शिवगण आदी माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक लढविणार आहेत.
उपऱ्यांना पहिल्या खेपेतच संधी
मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, प्रभाग क्र. ९ मधील माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनीही काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आता प्रभाग १६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग १६ मधून २०१७ च्या निवडणुकीत अंजली खेडकर सर्वसामान्य महिला आरक्षणातून निवडून आल्या होत्या. तर, मुंबई बँकेच्या संचालिका व अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्ष प्रवेशावेळीच उमेदवारी निश्चित झाली होती. त्यांनतर सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा राखी जाधव यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यांनतर त्यांना प्रभाग १३१ मधून उमेदवारी देण्यात आली.
नवनाथ बन देखील निवडणुकीच्या रिंगणात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मानखुर्द–शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक १३५ मधून ते प्रथमच निवडणूक लढविणार असून या प्रभागाला भाजपने युवा चेहरा दिला आहे.
