मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून पक्ष कार्यालयांची डागडुजीही पूर्ण होत आली आहे. स्पष्ट बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षाने सर्वात आधी आपले पक्ष कार्यालय ताब्यात घेतले असून शुक्रवारी पक्ष कार्यालयात सत्यनारायणाची पूजा करून भाजप महापालिकेतील आपल्या सत्ताकाळाचा श्रीगणेशा करणार आहे. तसेच शनिवारी पक्ष कार्यालयातून विधीवत पूजा करून मंत्रोच्चाराच्या घोषात महापौर पदाची उमेदवार नगरसेविका आपला अर्ज भरण्यासाठी जाणार आहे.
तब्बल चार वर्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून येत्या ११ फेब्रुवारीला महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात तयारीची लगबग सुरू आहे. मुख्य सभागृह आणि गेली चार वर्षे बंद असलेली पक्ष कार्यालये यांची डागडुजी सुरू आहे. या निवडणूकीत भाजप हा सर्वात जास्त जागा मिळालेला पक्ष आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर प्रथमच भाजपचा महापौर बसणार आहे. गेली पंचवीस तीस वर्षे पालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून भाजपने ही सत्ता आपल्याकडे खेचून आणलेली असून सत्ता स्थापनेचा प्रत्येक क्षण भाजप साजरा करणार आहे.
मुंबई महापालिकेत सध्या सर्वच पक्ष कार्यालयांची डागडुजी सुरू असून भाजपने मात्र पाठपुरावा करून सर्वात आधी आपले पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. येत्या शनिवारी मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी भाजपने आपल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे. त्याकरीता शुक्रवारी पक्ष कार्यालयात विधीवत पूजा करण्यात येणार आहे. यावेळी गटनेते गणेश खणकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे देखील उपस्थित राहणार आहेत. या पूजेचे रितसर आमंत्रणही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहे.
गेली पंचवीस- तीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरायला जाताना गळ्यात भगवे शेले, फेटे बांधून घोषणा देत अर्ज भरण्याचा कार्यक्रम होत असे. मात्र भाजपनकडून या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात पालिकेत धार्मिकतेचा रंगच अधिक बघायला मिळणार आणि त्यावरून राजकारण रंगणार हे निश्चित आहे.
मराठी नगरसेविकेच्या हस्ते पूजा
यावेळी महापौर पद हे महिला आरक्षित असल्यामुळे मुंबई महापालिकेवर महिला राज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप कार्यालयातील पूजेचा मानही नगरसेविकेला दिला जाणार असून मराठी पोशाखात पूजा करण्यात येणार असल्याची माहिती गटनेते गणेश खणकर यांनी दिली.

