“मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल मात्र प्रकल्प मार्गी लावा.”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. याचबरोबर मेट्रो-३ सुरू करण्याचं आव्हानही फडणवीसांनी दिलं आहे.

‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आरे मेट्रो स्थानक येथे आज (शनिवार) दुपारी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींची उपस्थिती राहणार आहे. मात्र या उद्घाटन समारंभाच्या अगोदर श्रेयावादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी भाजपाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. काम केलंय मुंबईने पाहीलंय, असा भाजपाने दावा केला आहे. तर दुसरीकडे लोकार्पण सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे भाजपाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी जरूर उद्धाटन करावं. पण जनतेला हे माहिती आहे, या दोन्ही मेट्रो आणि याचं काम देखील सुरू मी केलं होतं. अतिशय वेगाने ते काम पुढे गेलं होतं. काही कारणाने या सरकारमध्ये ते रखडलं.पण आज ते सुरू होतय. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल मात्र पण सगळ्या मेट्रो सुरू करा. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल पण मेट्रो तीनचा प्रश्न निकाली काढा. कारण, मेट्रो ३ जी आतापर्यंत सुरू होऊ शकली असती, ती आणखी चार वर्षे सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावं. पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो ३ चा रखडलेला प्रकल्प हा तत्काळ पूर्ण करावा.”

आजपासून दहिसर ते आरे मेट्रोसेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री ८ वाजता या मार्गिकेवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. रात्री दहापर्यंत मेट्रोच्या १० ते १२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. रविवारपासून मात्र सकाळी ६ ते रात्री १० अशी वेळापत्रकानुसार मेट्रो धावणार आहे. ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही मार्गिकेचा मिळून एकूण २०.७३ किमीचा हा टप्पा असणार आहे. या मार्गावर स्वयंचलित ११ मेट्रो गाडय़ा धावणार आहेत. असे असले तरी सुरुवातीचे काही महिने मेट्रोचालक (मेट्रो पायलट) मेट्रो गाडय़ा चालविणार आहेत. त्यानंतर विनाचालक गाडय़ा धावणार आहेत. मात्र  त्या मेट्रो चालकांच्या देखरेखीखालीच चालतील, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.