scorecardresearch

सत्तांतरामुळे भाजपला वाढीव मतांचा लाभ; राष्ट्रपती निवडणुकीतील संदर्भ राज्यात बदलले

राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे १७५ तर सरसकट खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०० आहे.

Droupadi Murmu
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी पाटणा येथे स्थानिकांशी संवाद साधला.

मुंबई : राज्यातील सत्ताबदलानंतर शिवसेना व अपक्षांमधील ५० आमदारांचे समर्थन भाजपला लाभल्याने या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील मतांचे गणित बदलले आहे. विधानसभेतील १६५ तसेच शिवसेनेतील काही खासदारांचे समर्थन लाभणार असल्याने १० हजारांपेक्षा अधिक मतमूल्याचा भाजपला लाभ होईल. 

राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे १७५ तर सरसकट खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०० आहे. राज्यातील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५०,४०० असले तरी एक जागा रिक्त असल्याने हे मूल्य आता ५०,२२५ झाले आहे. महाविकास आघाडीला १६० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा होता. १२०च्या आसपास आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपला राज्यातील आमदारांच्या एकूण मतांच्या मुल्यापैकी २१ हजार मतांची अपेक्षा होती. पण दोन आठवडय़ांतील नाटय़मय राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील राज्यातील मतांचे गणितच बदलले. भाजप नेत्यांनी सोमवारी रात्री राज्यातील मतांचा एकूण आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.  विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला १६४ आमदारांचे समर्थन लाभले. महाविकास आघाडीचे संख्याबळ ११० पर्यंत घटले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला राज्यातून १६५ पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन लाभेल, असे भाजप नेत्यांचे गणित आहे. ५० आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपच्या मतमूल्यात राज्यात ८,७५०ची वाढ होणार आहे. शिवसेनेचे १८ खासदार असून, काही खासदार हे शिंदे यांच्याबरोबर आहेत. या खासदारांचा पाठिंबा गृहीत धरल्यास शिंदे यांच्या बंडामुळे भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना १० हजारांपेक्षा मतमूल्याचा लाभच होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp candidate draupadi murmu will get more than 10000 votes after power change in maharashtra zws

ताज्या बातम्या