विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने यादी जाहीर केली असून, पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पंकजा मुंडेंना यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही प्रयत्न केला होता असे म्हटले होते. मुंबईत पत्रकरांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विधानपरिषदेच्या १० जागासाठी भाजपाचे ५ उमेदार पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घोषित केले आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमच्या पक्षामध्ये आम्ही कोरी पाकिटे असतो त्यावर जो पत्ता लिहिला जातो तेथे आम्ही जातो. त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना घेते,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

“केंद्रीय संघटनेने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी मान्य करायचा असतो. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांना खूप प्रयत्न केले होते. पण केंद्रीय संघटनेने त्यांच्याबाबत काही भविष्यातील विचार केला असेल. कार्यकर्त्यांची नाराजी क्षणभराची असते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पंकजा मुंडे या मध्य प्रदेश भाजपाच्या सहप्रभारी आहे. मध्य प्रदेश हे मोठं राज्य आहे. त्यांच्यासाठी आणखी काही जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाच्या कल्पनेमध्ये असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. ९ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, भाजपाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे सुभाष देसाई व दिवाकर रावते हे दोघे निवृत्त होत आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत सामान्य शिवसैनिकाला मोठ्या पदावर संधी मिळू शकते असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. तोच कित्ता विधान परिषद निवडणुकीत गिरवत नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पडवी यांना विधान परिषदेत संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil reaction after pankaja mude was rejected for the legislative council abn
First published on: 08-06-2022 at 12:33 IST