मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा गुरुवारी केला जाईल. देवेंद्र फडणवीस पुढील दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का, याविषयी औत्सुक्य आहे. यावेळी भाजपचे दहा-बारा ज्येष्ठ नेते आणि शिंदे गटातील काही नेते मंत्रीपदाची शपथ घेतील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापेक्षा उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. गेले काही दिवस अस्थिर राजकीय परिस्थिती होती. शिवसेनेतून बंडखोर आमदार फुटल्याने राज्यभरातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त असून हिंसक निदर्शने करीत आहेत व धमक्या दिल्या जात आहेत. राजकीय डावपेचांमध्ये काही कालावधी गेला. सर्वोच्च न्यायालयात आणि विधानसभा उपाध्यक्षांकडे आमदार अपात्रतेबाबतच्या याचिका प्रलंबित असल्याने सत्तास्थापनेचा दावा करणे आणि सरकारचा शपथविधी यासाठी फार वेळ घालवू नये, अशी भाजपची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी सत्तास्थापनेबाबत चर्चा केली आहे. शिंदे गटाला द्यावयाच्या मंत्रीपदांबाबत प्राथमिक बोलणी झाली आहेत.

 ठाकरे सरकार पाडण्यासाठी गेले काही दिवस राजकीय चाली खेळण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. भाजप व शिंदे गटाकडे कोणती खाती व किती मंत्रीपदे राहतील, याबाबत प्राथमिक बोलणी झाली असली तरी अंतिम निर्णय लवकरच होईल. त्यामुळे सुरुवातीला पूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी करण्यापेक्षा आधी निवडक मंत्र्यांनी शपथ घेवून काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, असा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा विचार आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

संख्याबळ..

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात फडणवीस यांनी शिवसेनेला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्रीपदे दिली होती. त्यावेळी भाजपचे संख्याबळ १२३ होते. आता भाजपचे संख्याबळ १०६ असून अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता ते ११३ होते.

शिंदेंना काय?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करण्याचे मोठे धाडस केल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी आधीच्या सरकारच्या काळात शिवसेनेने मागणी करुनही उपमुख्यमंत्रीपद दिले नव्हते. दोन सत्ताकेंद्रे असू नयेत, ही भूमिका त्यावेळी घेण्यात आली होती. मात्र शिंदे यांच्यामुळे भाजपला पुन्हा सत्ता मिळविणे शक्य झाल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्याबरोबरच महत्वाची खातीही दिली जातील. शिंदे गटाला अपक्षांसह १६-१७ मंत्रीपदे द्यावी लागतील, असे सूत्रांनी नमूद केले.

भाजपकडून जल्लोष..

 उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि भाजप नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होते.