मुंबई : सध्या मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत भाजपने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नालेसफाई सुरू करून सव्वा महिना लोटल्यानंतरही नालेसफाईचे चित्र विदारकच आहे. केवळ आकडेवारीचा खेळ करून नालेसफाई झाल्याचा दावा करून मुंबईकरांना पुराच्या संकटात लोटण्यात आले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने प्रशासक, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना गुरुवारी पत्र पाठवून दिला. भाजप आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी गुरुवारी मालाड (प.) येथील वळनाई नाला, जुहू तारा रोडवरील शिवाजीनगर नाला, कुर्ला कारशेड रोडवरील मिलिंद नगर नाल्याची पाहणी केली आणि सध्या सुरू असलेल्या नालेसफाईबाबत नाराजी व्यक्त केली.

दरवर्षी मुंबईत मार्चअखेरीस नालेसफाईची कामे सुरू करण्यात येतात. पालिका सभागृहाची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली. तत्पूर्वी प्रशासनाने सादर केलेल्या नालेसफाईच्या प्रस्तावांना स्थायी समिती अध्यक्षांनी मंजुरी दिली नाही. परिणामी, नालेसफाई नियोजित वेळेत सुरू होऊ शकली नाही. प्रशासक या नात्याने चहल यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आणि त्यानंतर नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली.  भाजपच्या नगरसेवकांनी ७ ते १२ एप्रिल या कालावधीत मुंबईतील नाल्यांची पाहणी केली होती.

नाल्यांमध्ये प्रचंड गाळ आणि कचरा असल्याचे त्यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. भाजपच्या नगरसेवकांनी गुरुवारी पुन्हा नाल्यांची पाहणी केली. या पाहणीत नाल्यांमध्ये कचरा साचल्याचे निदर्शनास आल्याची बाब आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात आली. पत्रासोबत २० नाल्यांत साचलेल्या कचऱ्याची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत.  केवळ आकडय़ांचा खेळ करून नालेसफाईच्या मूळ कामाला बगल देऊ नये आणि मुंबईला पुरात लोटू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने पत्राद्वारे आयुक्तांना दिला आहे. नालेसफाईच्या भ्रष्टाचाराची संबंधित तपास यंत्रणांकडे तक्रार करण्यात येईल, असेही या पत्रात नमूद केले आहे.